प्रियम गर्गच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेची सुरुवात विजयाने केली आहे. सलामीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर ९० धावांनी मात केली. भारताने विजयासाठी दिलेलं २९८ धावांचं आव्हान लंकेला पेलवलं नाही. श्रीलंकेचा संघ २०७ धावांपर्यंतच मजल मारु शकला. भारताकडून अक्ष सिंह, सिद्धेश वीर आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी २-२ तर कार्तिक त्यागी-सुशांत मिश्रा-यशस्वी जैस्वालने १-१ बळी घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. नवोद पर्नवितना अवघ्या ६ धावा काढून माघारी परतला. मात्र यानंतर रविंदु रसंथा आणि कमिल मिशारा यांनी महत्वपूर्ण भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. मात्र ही जोडी फोडण्यात भारतीय गोलंदाजांना यश आल्यानंतर लंकेचा डाव पुन्हा एकदा कोलमडला. मधल्या फळीत कर्णधार निपुण धनंजयाने अर्धशतक झळकावत भारतीय गोलंदाजांना टक्कर देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. अखेरीस लंकेला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

त्याआधी, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी २९७ धावांचा डोंगर उभा केला. मुंबईकर सलामीवीर यशस्वी जैस्वाल, कर्णधार प्रियम गर्ग आणि ध्रुव जोरेल यांनी अर्धशतकी खेळी करत आपली महत्वाची भूमिका बजावली.श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय सलामीवीरांनीह आपल्याला मिळालेल्या संधीचा फायदा घेताना, धडाकेबाज सुरुवात केली. यशस्वी जैस्वाल आणि दिव्यांश सक्सेना यांनी पहिल्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी केली. सक्सेला माघारी परतल्यानंतर एन. तिलक वर्मा आणि आणि प्रियम गर्ग यांनी यशस्वीला चांगली साथ दिली. ५९ धावा काढून यशस्वी माघारी परतला. यानंतर कर्णधार गर्गने सर्व सुत्र आपल्याकडे घेतली.

अवश्य वाचा – U-19 World Cup : पहिल्याच प्रयत्नात मुंबईकराचं ‘यशस्वी’ पाऊल, महत्वाचा टप्पा केला सर

मधल्या फळीतल्या फलंदाजांच्या साथीने महत्वाची भागीदारी रचत गर्गने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. त्याने ५२ धावा केल्या. भारतीय फलंदाजांच्या या आश्वासक खेळीमुळे पहिल्याच सामन्यात संघाने २९७ धावांचा पल्ला गाठला. श्रीलंकेकडून अमशी डी-सिल्वा, अशीन डॅनिअल, दिलशान मधुशनका आणि कविंदू नदीशन यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: U 19 world cup india vs sri lanka bloemfontein live updates
First published on: 19-01-2020 at 17:44 IST