UEFA Champions League : स्पर्धेत लियोनल मेस्सीच्या गोलच्या मदतीने बार्सिलोना क्लबने नापोलीला ३-१ने धूळ चारली. शनिवारी रात्री उशिरा झालेल्या सामन्यानंतर ४-२ अशा ‘अग्रीगेट लीड’च्या बळावर बार्सिलोनाने विजय मिळवला. या विजयानंतर बार्सिलोनाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्या फेरीत त्यांचा सामना बायर्न म्युनिचशी होणार आहे.

बार्सिलोना-नापोली सामन्यात सारे गोल पूर्वार्धातच झाले. १०व्या मिनिटाला बार्सिलोनाच्या क्लेमेंट लेंग्लेटने पहिला गोल केला. त्यानंतर २३व्या मिनिटाला मेस्सीने दुसरा गोल करत २-०ची आघाडी घेतली. त्यानंतर पूर्वार्धातील अतिरिक्त वेळेत पहिल्या मिनिटाला लुइस सुआरेझने बार्सिलोनाला तिसरा गोल (पेनल्टी) मिळवून दिला. तर पाचव्या मिनिटात लोरेन्झो इन्साइने गोल (पेनल्टी) करत बार्सिलोनाची आघाडी कमी करत सामना ३-१ असा झाला. पण उत्तरार्धात मात्र एकही गोल होऊ शकला नाही. त्यामुळे बार्सिलोना विजयी झाला.

दुसऱ्या सामन्यात बायर्न म्युनिचने चेल्सीला ४-१ने पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी चेल्सीवर ७-१ असा अग्रीगेट लीड घेत विजय मिळवला.