करोना व्हायरसमुळे गेल्या वेळी स्थगित केलेली युरोपियन फुटबॉल स्पर्धा या वेळीही होणार की नाही याबद्दल साशंकता होती. परंतु यंदा ही स्पर्धा होणार असून तिचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. ११ जूनपासून (भारतीय वेळेनुसार १२ जून) युरो कप २०२० स्पर्धा सुरू होईल. स्पर्धेच्या ६० वर्षांच्या इतिहासात प्रथमच ११ वेगवेगळ्या शहरांमध्ये सामने होणार आहेत. यूईएफएच्या कार्यकारी समितीने अंतर्गत आढावा घेऊन अनेक भागधारकांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. १९६०मध्ये युरोपियन फुटबॉल स्पर्धेची सुरुवात झाली. २०२०मध्ये या स्पर्धेला ६० वर्षे पूर्ण झाली.

युरो कप चॅम्पियन पोर्तुगाल आणि फिफा वर्ल्डकप विजेता संघ फ्रान्ससहित सर्व संघांना ६ गटात विभागण्यात आले आहे. या वेळी लंडन, ग्लासगो, कोपेनहेगन, सेव्हिल, बुडापेस्ट, एम्स्टरडॅम, रोम, म्युनिक, बाकू, बुखारेस्ट आणि सेंट पीटर्सबर्ग येथे सामने होतील. लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर या स्पर्धेची अंतिम लढत होईल.

हेही वाचा – ‘‘IPLमुळे इंग्लंडचे खेळाडू आपले तळवे चाटतात, मला त्यांचे रंग माहीत आहेत”

euro 2020 schedule and teams fixtures announced
युरो कप २०२० वेळापत्रक

 

या महिनाभर चालणार्‍या या स्पर्धेत एकूण २४ संघ ५१ सामने खेळतील. २६ जूनपासून बाद फेरी सुरू होण्यापूर्वी प्रत्येक संघ गट टप्प्यात तीन सामने खेळेल. ११ जुलै (भारतीय वेळेनुसार १२ जुलै) रोजी अंतिम लढत खेळली जाईल. गतविजेता पोर्तुगाल १५ जूनपासून हंगेरीविरूद्ध मोहीम सुरू करणार आहे. पोर्तुगाल ज्या गटात आहे त्याला ‘ग्रुप ऑफ डेथ’ म्हणतात. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नेतृत्वात पोर्तुगालला गट एफमध्ये स्थान देण्यात आले आहे. यामध्ये विश्वविजेता फ्रान्स, चार वेळा विश्वचषक जिंकणारा जर्मनी आणि हंगेरीचा समावेश आहे.

भारतात कशी आणि कुठे पाहता येणार?

सोनी स्पोर्ट्स नेटवर्क हे भारतातील यूईएफए युरो कप २०२०चे अधिकृत प्रसारक आहे. सोनी टेन २ आणि सोनी टेन २ (हिंदी) वर ही स्पर्धा थेट प्रसारित केली जाईल. यासह त्यांचे संबंधित एचडी चॅनेल भारतात थेट असतील. SonyLiv अॅपवर या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण उपलब्ध होईल.

युरो कपसाठी गट –

  • ग्रुप ए – तुर्की, इटली, वेल्स, स्वित्झर्लंड.
  • ग्रुप बी – डेन्मार्क, फिनलँड, बेल्जियम, रूस.
  • ग्रुप सी – नेदरलँड, युक्रेन, ऑस्ट्रिया, नॉर्थ मॅसेडोनिया.
  • ग्रुप डी – इंग्लंड, क्रोएशिया, स्कॉटलँड, चेक रिपब्लिक.
  • ग्रुप ई – स्पेन, स्वीडन, पोलंड, स्लोवाकिया.
  • ग्रुप एफ – हंगरी, पोर्तुगाल, फ्रान्स, जर्मनी.