पीटीआय, मुंबई
आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी युवा भेदक गोलंदाज उमरान मलिकचा भारतीय संघात समावेशाबाबत विचार करण्यात यावा, असे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.
यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये हैदराबादकडून खेळताना जम्मूच्या या २२ वर्षीय खेळाडूने आतापर्यंत अनेक रथी-महारथी फलंदाजांना अचंबित केले आहे. गुजरातविरुद्धच्या सामन्यात त्याने पाच बळी घेताना पुन्हा आपली छाप पाडली आहे. त्यामुळेच आता गावस्कर यांनी उमरानची इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी निवड करण्यात यावी, असा सल्ला दिला आहे.
‘‘उमरानच्या कामगिरीमुळे त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे लवकरच खुले होतील. त्याचा विचार भारताच्या आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी करण्यात यावा. त्याला अंतिम ११ मध्ये खेळण्यासाठी स्थान मिळो अथवा न मिळो, परंतु तो संघासोबत असणे खूप महत्त्वाचे आहे,’’ असे गावस्कर यांनी म्हटले आहे.
‘आयपीएल’च्या यंदाच्या हंगामात उमरान सातत्याने १५० किमी वेगाने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करीत आहे. तसेच त्याने आतापर्यंत १५ फलंदाज बाद केले असून एकाच डावात पाच बळी घेण्याचा पराक्रमही त्याने दाखवला आहे. भारतीय संघ जूनमध्ये इंग्लंडच्या दौऱ्यावर जात असून तेथे एकदिवसीय, ट्वेन्टी-२० मालिकेसह मागील वर्षी करोनामुळे रद्द करण्यात आलेला पाचवा कसोटी सामनादेखील खेळवण्यात येणार आहे. २६ जूनपासून डब्लिनमध्ये भारत आर्यलडविरुद्ध दोन ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे.
उमरानकडे योग्य लक्ष द्यावे -व्हिटोरी
उमरान हा उदयोन्मुख गुणी गोलंदाज असून, त्याच्याकडे योग्य लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचा वेग हेच त्याचे प्रमुख अस्त्र आहे. ब्रेट ली, शोएब अख्तर आणि शॉन टेट यांच्यानंतर आता उमरानकडे वेगासोबतच अचूकतेची दुर्मीळ प्रतिभा आहे. ज्यामुळे फलंदाजांना तो अडचणीत आणू शकतो, असे न्यूझीलंडचा माजी गोलंदाज डॅनियल व्हिटोरी याने म्हटले आहे.