भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सहसचिव शिरगावकर यांचे मत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : करोना विषाणूला कुणीही रोखू शकत नाही. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा होणार की नाही, हा धोका पुढील दिवस कायम राहणार आहे. करोनामुळे प्रत्येकाचे आयुष्य धोक्यात आले आहे. त्यामुळे स्वत:चे आरोग्य उत्तम राखत लसीकरण करून घेणे तसेच सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे योग्य ठरेल, असे मत भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे (आयओए) सहसचिव तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष नामदेव शिरगावकर यांनी व्यक्त केले.

‘‘खेळाडूंच्या दृष्टीने ऑलिम्पिकचे आयोजन अत्यावश्यक आहे. पण त्याचबरोबर खेळाडूंचे आरोग्य आणि त्यांची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे. संयोजकांनी पदकांपेक्षा दुखापती किंवा अन्य गोष्टींचा विचार करू नये. त्यांनी फक्त करोनाविषयक नियमांचे चोख पालन केले जात आहे की नाही, याकडे बारकाईने लक्ष द्यावे,’’ असेही त्यांनी नमूद केले.

भारताला ऑलिम्पिकमध्ये पदकांची जास्त संधी आहे, असेही शिरगावकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘‘भारतीय नेमबाज आणि कुस्तीपटू सध्या बहरात असल्यामुळे भारताचे खेळाडू टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नक्कीच पदकांची लयलूट करतील. भारतीय खेळाडू सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करत आहेत. ते स्वत:चे आयुष्य धोक्यात आणून या स्पर्धेत सहभागी होत आहेत. त्यामुळे त्यांच्या धैर्याचा सन्मान करून चांगल्या कामगिरीसाठी पाठिंबा द्यायला हवा.’’

ऑलिम्पिकला ८० टक्के नागरिकांचा विरोध

टोक्यो ऑलिम्पिकला अवघे १० आठवडे शिल्लक राहिले असतानाच, जपानमधील तब्बल ८० टक्के जनतेनी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या आयोजनाला विरोध दर्शवला आहे. जपानमध्ये सध्या भयावह परिस्थिती असून वारंवार घेतल्या जाणाऱ्या मतदानात जपानी नागरिकांची ऑलिम्पिकविरोधातील नाराजी स्पष्टपणे दिसून येत आहे. ‘असाही शिमबून’ या दैनिकाने गेल्या आठवडय़ात घेतलेल्या मतदानात, ४३ टक्के लोकांनी ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्याला प्राधान्य दिले, तर ४० टक्के नागरिकांनी ही स्पर्धा पुढे ढकलण्याला पाठिंबा दर्शवला आहे. याच दैनिकाने गेल्या महिन्यात घेतलेल्या मतदानात ऑलिम्पिकच्या आयोजनाला विरोध करणाऱ्यांमध्ये ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आमची मेहनत वाया जाणार नाही -राजपूत

सर्व साधवगिरीच्या उपाययोजना राबवत ऑलिम्पिक स्पर्धा होणारच, असा विश्वास भारताचा नेमबाज संजीव राजपूत याने व्यक्त केला. ‘‘ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा केला जाणार नाही. सर्व खेळाडूंनी करोनाविषयक नियमांचे पालन करावे, अशी विनंती मी करेन. जर सर्वानी आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडली तर ऑलिम्पिक स्पर्धाही सुरळीतपणे होतील. आमची मेहनतही वाया जाणार नाही,’’ असे राजपूतने सांगितले. राजपूत सध्या भारतीय संघासमवेत क्रोएशिया दौऱ्यावर असून तेथून हा संघ थेट ऑलिम्पिकसाठी रवाना होणार आहे.

फक्त ऑलिम्पिकमध्येच खेळाडूंचे आयुष्य धोक्यात येणार आहे का? प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर दैनंदिन जीवनातही आपण प्रत्येक क्षणी धोक्याचा सामना करत आहोत. करोनाचा धोका खूप मोठा असून या विषाणूचा संसर्ग झपाटय़ाने होत आहे. त्यामुळे करोनाविषयक नियमांचे पालन करणे, स्वत:चे आरोग्य निरोगी राखणे तसेच लसीकरण करवून घेणे, या क्षणी गरजेचे आहे. करोनाला तुम्ही रोखू शकत नाहीत, म्हणूनच ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाबाबतचा धोका कायम राहणार आहे.

– नामदेव शिरगावकर, ‘आयओए’चे सहसचिव

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uncertainty remains around tokyo olympic event says namdev shirgaonkar zws
First published on: 18-05-2021 at 01:21 IST