प्रतिस्पर्धी खेळाडूला चावल्याप्रकरणी उरुग्वेच्या लुईस सुआरेझला झालेल्या कठोर शिक्षेचा निषेध म्हणून उरुग्वेचे प्रशिक्षक ऑस्कर ताबारेझ यांनी फिफाच्या धोरण समितीचा राजीनामा दिला आहे. बाद फेरीत उरुग्वेचा कोलंबियाशी सामना होणार आहे. त्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत ताबारेझ यांनी १५ मिनिटांच्या भाषणात समितीच्या राजीनाम्याची घोषणा केली.
 सुआरेझला कठोर शिक्षा व्हावी यासाठी इंग्रजी भाषिक प्रसारमाध्यमांनी फिफाच्या शिस्तपालन समितीवर दबाव आणला असल्याचा आरोप ताबारेझ यांनी केला. उरुग्वे लहान देश असल्याने त्यांना बाजूला करणे सोपे असल्याचेही त्यांनी सांगितले.
 ‘‘आपल्याला हव्या तशा निर्णयासाठी संघटनेवर दबाब आणण्याचे कृत्य योग्य नाही. ज्या समितीने सुआरेझला शिक्षा सुनावली, त्यांच्या आणि माझ्या मूल्यांमध्ये खूपच फरक आहे’, असे ताबारेझ यांनी सांगितले.
इटलीविरुद्धच्या लढतीत सुआरेझने जिऑर्जिओ चिएलिनीच्या खांद्यावर चावल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकारासाठी सुआरेझवर चार महिन्यांची आंतरराष्ट्रीय बंदी घालण्यात आली होती. कारकिर्दीत तिसऱ्यांदा सुआरेझला चावण्यासाठी शिक्षा सुनावण्यात आली आहे.