वृत्तसंस्था, न्यूयॉर्क : यंदाच्या अमेरिकन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला विभागातील सनसनाटी निकालांची मालिका दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. गतविजेत्या एमा रॅडूकानू आणि जपानच्या चार ग्रँडस्लॅम विजेत्या नाओमी ओसाकाचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. त्याच वेळी पुरुषांमध्ये राफेल नदाललाही पहिल्या विजयासाठी झगडावे लागले. 

ब्रिटनची ११वी मानांकित रॅडूकानू २०१७ नंतर अमेरिकन स्पर्धेत पहिल्याच फेरीत गारद होणारी पहिली गतविजेती खेळाडू ठरली. २०१७ मध्ये अँजेलिक कर्बरला पराभवाचा सामना करावा लागला होता. गतवर्षी रॅडूकानूने पात्रता फेरीतून येताना सलग १० सामने जिंकून स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. यंदा मात्र ती अपेक्षांच्या दडपणाखाली दिसून आली. पहिल्या फेरीच्या सामन्यात फ्रान्सच्या अ‍ॅलिझ कॉर्नेटविरुद्ध तिचा खेळ कधीच बहरला नाही. कॉर्नेटने रॅडूनाकूचा ६-३, ६-३ असा सहज पराभव केला.

ओसाकालाही पहिल्या फेरीच्या सामन्यात चांगला खेळ करण्यात अपयश आले. अमेरिकेच्या १९व्या मानांकित डॅनिएले कॉलिन्सने अमेरिकन स्पर्धेतील दोन वेळच्या विजेत्या ओसाकाला ७-६ (७-५), ६-३ असे सरळ सेटमध्ये नमवले. कॉलिन्सने यंदा ऑस्ट्रेलिया खुल्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. दुसऱ्या फेरीत तिची गाठ स्पेनच्या ख्रिस्टिना बुसाशी पडणार आहे.

अमेरिकन स्पर्धेत कारकीर्दीतील ८०वा विजय मिळविण्याचे अनुभवी व्हिनस विल्यम्सचे स्वप्न भंगले. बेल्जियमच्या अ‍ॅलिसन व्हॅन ओयट्व्हांकने व्हिनसला ६-१, ७-६ (७-५) असे पराभूत केले. पात्रता फेरीतून आलेल्या फ्रान्सच्या क्लारा बुरेलने विम्बल्डन विजेत्या एलिना रिबाकिनाला ६-४, ६-४ असा पराभवाचा धक्का दिला.

पुरुष एकेरीत नोव्हाक जोकोविचच्या गैरहजेरीत जेतेपदासाठी प्रमुख दावेदार असलेल्या नदालने विजयी सुरुवात केली. मात्र त्याला चार सेटपर्यंत झुंजावे लागले. पहिलाच सेट त्याने गमवला होता. मात्र त्यानंतर त्याने नियंत्रित खेळ करून ऑस्ट्रेलियाच्या रिंकी हिजीकाटावर ४-६, ६-२, ६-३, ६-३ अशी सरशी साधली. आता त्याची फॅबिओ फॉग्निनीशी गाठ पडेल.

तिसऱ्या मानांकित स्पेनच्या कार्लोस अल्कराझने अर्जेटिनाच्या सेबॅस्टिएन बाएझचा पराभव केला. अल्कराझने पहिले दोन सेट ७-५, ७-५ असे जिंकले. तर तिसऱ्या सेटमध्ये ०-२ अशा फरकाने पिछाडीवर गेल्यानंतर बाएझने माघार घेतली. आठव्या मानांकित हर्बर्ट हुरकाझने जर्मनीच्या ऑस्कर ओट्टेला ६-४, ६-२, ६-४ असे नमवले.

पेटकोव्हिचची निवृत्ती

जर्मनीच्या आंद्रेआ पेटकोव्हिचने महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील पराभवानंतर टेनिसमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. ऑलिम्पिक विजेत्या बेलिंडा बेंचिचने पेटकोविचचे आव्हान ६-२, ४-६, ६-४ असे मोडून काढले. या लढतीनंतर पेटकोव्हिचने निवृत्तीचा निर्णय कोर्टवरच जाहीर केला. तिने ‘डब्ल्यूटीए’ मालिकेतील नऊ विजेतीपदे मिळविली आहेत. २०११ मध्ये तिने क्रमवारीत नवव्या क्रमांकापर्यंत मजल मारली होती.