सहाव्यांदा विजेतेपद मिळविण्याच्या प्रतीक्षेत असलेला रॉजर फेडरर व गतविजेती सेरेना विल्यम्स यांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत आपापले सामने सहज जिंकत आगेकूच केली.
आतापर्यंत १७ ग्रँड स्लॅम जेतेपदांना गवसणी घालणाऱ्या स्वित्र्झलडच्या फेडररने अर्जेन्टिनाच्या कालरेस बेलरेक याच्यावर ६-३, ६-२, ६-१ अशी सरळ तीन सेट्समध्ये मात केली. फेडररने सहा बिनतोड सव्‍‌र्हिस व ३७ अचूक फटक्यांसह बेलरेकवर वर्चस्व गाजवले. त्याने २००४ ते २००८ अशी सलग पाच वर्षे अमेरिकन स्पर्धेचा विजेता होण्याचा मान मिळविला होता. फेडररला यंदा विम्बल्डन स्पर्धेत दुसऱ्या फेरीत सर्जी स्टॅखोव्हस्की याच्याकडून अनपेक्षित पराभवाचा धक्का बसला होता. फेडररची उपांत्यपूर्व फेरीत राफेल नदालशी गाठ पडण्याची शक्यता आहे.
स्पेनच्या चौथ्या मानांकित डेव्हिड फेररने आपलाच सहकारी रॉबर्टा बाटिस्टा अ‍ॅगूटचे आव्हान ३-६, ६-७ (५-७), ६-१, ६-२ असे संपुष्टात आणले. आठव्या मानांकित रिचर्ड गास्केटने स्टीफन रॉबर्टवर ६-३, ७-५, ७-५ असा सहज विजय मिळविला. दुसऱ्या व तिसऱ्या सेटमध्ये स्टीफनने जिद्दीने खेळ करीत गास्केटला झुंजवले.
जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित खेळाडू सेरेना विल्यम्सने गॅलिना व्होस्कोबोएव्हा हिचा ६-३, ६-० असा धुव्वा उडवला. तिने आतापर्यंत पाच वेळा अमेरिकन स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले आहे. या स्पर्धेत सेरेना विजेती ठरली तर तिचे हे १७वे ग्रँड स्लॅम अजिंक्यपद ठरणार आहे. सेरेनाने गॅलिनाविरुद्धच्या सामन्यात निर्विवाद वर्चस्व गाजविले. तिने सामन्यातील शेवटच्या आठ गेम्स जिंकल्या. सारा इराणी हिला मात्र अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. फ्रान्सच्या फ्लेव्हिया पेनेट्टाने इराणीला ६-३, ६-१ असे सरळ दोन सेट्समध्ये हरविले. तिने सात बिनतोड सव्‍‌र्हिसेसचा उपयोग केला.

महेश भूपतीचे आव्हान संपुष्टात
न्यूयॉर्क : भारतीय खेळाडूंना अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतला शुक्रवारचा दिवस संमिश्र ठरला. सानिया मिर्झा व लिएँडर पेस यांनी दुहेरीत आव्हान राखले, मात्र महेश भूपती याला पराभवाचा धक्का बसला. महिला दुहेरीत सानियाने चीनची खेळाडू जेई झेंग हिच्या साथीत जर्मनीच्या अ‍ॅनिका बेक व प्युतरे रिकान मोनिकापुईग यांच्यावर ६-२, ६-२ असा सरळ दोन सेट्समध्ये विजय मिळविला.  दहाव्या मानांकित सानिया व झेंग यांनी कॅटलीन मरोसी (हंगेरी) व मेगन मोल्टॉन लेवी (अमेरिका)यांच्याशी खेळावे लागणार आहे. पेस याने राडेक स्टेपानेक याच्या साथीत अपराजित्व राखले. त्यांनी पुरुषांच्या दुहेरीत जाकरे नेमीनेन व दिमित्री तुर्सुनोव्ह यांचा ६-४, ७-६ (७-४) असा पराभव केला. भारताच्या भूपती याला जर्मनीच्या फिलीप पेझ्शनर याच्या साथीत पराभव स्वीकारावा लागला.