Vaibhav Suryavanshi Batting In PKL 2025: प्रो कबड्डी लीग २०२५ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्या लेगचे सामने गिशवखपट्टणममध्ये सुरू आहे. या स्पर्धेतील पहिल्या दिवशी भारतीय क्रिकेट संघातील युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीने देखील सामना पाहण्यासाठी हजेरी लावली होती. देशांतर्गत क्रिकेटमध्ये बिहारकडून आणि आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या वैभवने वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी आपला ठसा आहे. या कामगिरीची दखल घेऊन त्याला उद्घाटनाच्या सामन्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं.
उद्घाटनाच्या सामन्यासाठी वैभव सूर्यवंशीने लावली हजेरी
प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील पहिला सामना २९ ऑगस्टला पार पडला. वैभवला पाहून सर्वच उत्साहित झाले. खेळाडू देखील त्याला भेटण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते. वैभवचा देखील आनंद गगनात मावेनासा झाला होता. यादरम्यान वैभवने कबड्डीच्या कोटवर क्रिकेटचे काही आकर्षक फटके देखील मारले. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कबड्डीचे खेळाडू वैभव सूर्यवंशीला गोलंदाजी करताना दिसून येत आहेत. तर वैभव तुफान फटकेबाजी करताना दिसून येत आहे. त्यानंतर त्याने गोलंदाजी देखील केली. आता कबड्डीच्या स्पर्धेत आला आहे, तर कबड्डी न खेळल्याशिवाय कसं चालेल. त्यामुळे वैभव त्यांच्यासोबत कबड्डी देखील खेळताना दिसून आला. वैभवने चढाई करताच बचाव करत असलेल्या खेळाडूंनी त्याची पकड केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पहिल्या दिवशी या स्पर्धेत दोन सामने रंगले. पहिल्या सामन्यात तेलुगू टायटन्स आणि तमिळ थलायवाज हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्याचा निकाल शेवटच्या मिनिटाला लागला. तमिळ थलायवाजने हा सामना ३८ -३५ ने आपल्या नावावर केला. या सामन्यात तमिळ थलायवाजकडून पवन सेहरावत चमकला. त्यानंतर स्पर्धेतील दुसऱ्या लढतील पुणेरी पलटण आणि बेंगळुरू बुल्स हे दोन्ही संघ भिडले. हा सामना बरोबरीत सुटला होता. त्यामुळे सामन्याचा निकाल हा टायब्रेकरने लागला. टायब्रेकरमध्ये पुणेरी पलटणने ६-४ ने बाजी मारली.