ओदिशा आणि बलाढय़ कर्नाटक संघाविरुद्ध सामना अनिर्णीत ठेवण्यात यशस्वी ठरलेल्या विदर्भाला आता प्रतीक्षा आहे हंगामातील पहिल्या विजयाची.
आदित्य शनवारे, अनुभवी वसिम जाफर आणि सुब्रमण्यम बद्रीनाथ यांच्यावर विदर्भच्या फलंदाजीची भिस्त आहे. फैझ फझल आणि अष्टपैलू रवी जंगीडकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा आहे. श्रीकांत वाघ आणि अक्षय वाखरे जोडीला कामगिरी उंचवावी लागणार आहे.
शेवटच्या लढतीत विदर्भाने पहिल्या डावात कर्नाटकच्या मातब्बर फलंदाजांना वेसण घातली होती, मात्र दुसऱ्या डावात कर्नाटकच्या फलंदाजांनी मुक्तपणे फलंदाजी केली होती. बाद फेरीत स्थान मिळवायचे असेल तर विदर्भाला विजय मिळवावा लागणार आहे. घरच्या मैदानावर विदर्भासमोर आसामच्या रूपात तुलनेने सोपे आव्हान आहे.
दुसरीकडे आसामने कर्नाटकविरुद्धची लढत अनिर्णीत राखली होती. दुसऱ्या लढतीत त्यांनी राजस्थानवर डावाने विजय मिळवला होता. अरुण कार्तिकची फलंदाजी आसामसाठी जमेची बाजू आहे. अरुप आणि कृष्णा दास ही गोलंदाजांची जोडगोळी आसामसाठी निर्णायक आहे. डावाच्या फरकाने विजय मिळाल्याने आत्मविश्वास उंचावलेल्या आसामला उष्ण आणि आद्र्र वातावरणात विदर्भ संघाचा सामना करायचा आहे.