एकीकडे भारत – विंडीज मालिका सुरु आहे. तर दुसरीकडे अॅशेस मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना सध्या बर्मिंगहॅमला सुरु आहे. तब्बल एका वर्षाच्या बंदीनंतर प्रथमच कसोटी क्रिकेटच्या मैदानात उतरलेल्या स्टीव्ह स्मिथने दोनही डावात शतक ठोकून आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. त्याच्या सलग दुसऱ्या शतकामुळेच ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थिती प्राप्त झाली आहे.
या सामन्यात स्मिथ आणि मॅथ्यू वेड या जोडीने उत्तम कामगिरी केली. त्यामुळे स्मिथला रोखण्यासाठी इंग्लंडच्या खेळाडूंनी रडीचा डाव खेळल्याचे पाहायला मिळाले. स्मिथने दुसऱ्या डावात सर्व गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना स्मिथ थोडक्यात बचावला. फिरकीपटू मोईन अली याने टाकलेला चेंडू त्याच्या हेल्मेटच्या जवळून थेट यष्टिरक्षकाकडे गेला. जर चेंडू थोडा जरी कमी लांब गेला असता तर तो चेंडू स्मिथच्या हेल्मेटवर आदळला असता. तसेच चेंडू वेळेत हाती मिळाला असता, तर यष्टिरक्षकाने स्मिथला यष्टिचीत देखील केले असते.
Moeen’s brought the game into disrepute #Ashes19 #Ashes #AUSvENG pic.twitter.com/YswsfVd5V2
— Sam Alexander (@samjalexander_) August 4, 2019
ऑस्ट्रेलियानं यजमान इंग्लंडसमोर विजयासाठी ३९८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव ७ बाद ४८७ धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात इंग्लंडने चौथ्या दिवसअखेर बिनबाद १३ धावा केल्या. तयामुळे अखेरच्या दिवशी विजयासाठी इंग्लंडला ३८५ धावा कराव्या लागणार आहेत.
पहिल्या डावात ८ बाद १२२ धावांवरून स्मिथने ऑस्ट्रेलियाला २८४ धावांपर्यंत मजल मारून दिली. पहिल्या डावात स्मिथनं २१९ चेंडूंत १६ चौकार व २ षटकार खेचून १४४ धावा केल्या. दुसऱ्या डावातही स्मिथने दमदार खेळी केली. इंग्लंडच्या पहिल्या डावातील ९० धावांच्या आघाडीचा पाठलाग करताना दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाचे आघाडीचे तीन फलंदाज झटपट गमावले. त्यानंतर स्मिथ आणि टॅ्व्हीस हेड यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. या जोडीने १३० धावांची भागीदारी करून संघाला आघाडी मिळवून दिली. ती आघाडी जास्त नव्हती. पण त्याच वेळी स्मिथने दुसऱ्या डावातही शतक ठोकले.