Bangladesh vs South Africa Emerging Test Players Fight on Ground : ढाका येथे बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेच्या युवा (इमर्जिंग) संघांमध्ये भर मैदानात राडा झाला आहे. या घटनेचे व्हिडीओ व फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. ढाका येथे उभय देशांच्या युवा संघांमध्ये चार दिवसीय क्रिकेट सामना चालू आहे. या सामन्यादरम्यान दोन्ही संघांमधील खेळाडू भर मैदानात भिडल्याचं पाहायला मिळालं. दोन्ही बाजूच्या खेळाडूंनी एकमेकांवर हात उगारला, धक्काबुक्की केली आणि या ‘जंटलमन्स गेम’ला गालबोट लावलं आहे. खेळाडूंमधील राडा थांबवण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेलेल्या पंचांना देखील धक्काबुक्कीचा सामना करावा लागला आहे.

अखेर, पंचांनी दोन्ही खेळाडूंमध्ये मध्यस्थी करून वाद मिटवला. दोन्ही खेळाडूंना वेगवेगळ्या दिशेला नेऊन राडा थांबवला. बांगलादेशचा २२ वर्षीय फलंदाज रिपोन मंडल व दक्षिण आफ्रिकेचा २९ वर्षीय जलदगती गोलंदाज शेपो एंतुलीमध्ये बाचाबाची झाली होती. त्यातूनच दोन्ही खेळाडू भर मैदानात भिडले. त्यानंतर दोन्ही बाजूचे खेळाडू आमनेसामने उभे ठाकले होते. दरम्यान, आतापर्यंत या राड्याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र, दोन्ही खेळाडूंवर काही सामन्यांची बंदी घातली जाऊ शकते. याप्रकरणी पंचांना अधिकृत अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. पंचांचा अहवाल समोर आल्यानंतर सदर खेळाडूंवर कारवाई केली जाऊ शकते.

मैदानावर नेमकं काय घडलं?

ईएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार रिपोनने एंतुलीच्या चेंडूवर षटकार लगावला होता. त्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये संघर्ष सुरू झाला. दोन्ही खेळाडू बराच वेळ एकमेकांकडे रागाने बघत होते. काही वेळाने रिपोन नॉन स्ट्राइकर एंडला उभ्या त्याच्या साथीदाराच्या दिशेने चालू लागला. त्याचवेळी एंतुली बांगलादेशी फलंदाजाकडे पाहून काहीतरी बोलला. त्यावर रिपोननेही उत्तर दिलं. त्यातून दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली व दोघेही एकमेकांच्या दिशेने चालू लागले. दोघांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली. त्याचवेळी एंतुलीने रिपोनचं हेल्मेट काढण्याचा प्रयत्न केला. त्यावर रिपोननेही एंतुलीला हातातली बॅट दाखवली.

दोघांमधील धक्काबुक्की पाहून पंचांनी दोन्ही खेळाडूंच्या दिशेने धाव घेतली. पंच कमरुज्जमान यांनी एंतुली याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र एंतुलीने पंचांना बाजूला करून रिपोनच्या हेल्मेटवर फटका मारला, त्याचं हेल्मेट ओढलं. त्यानंतर इतर खेळाडू मध्ये पडले व त्यांनी दोन्ही खेळांडूना बाजूला नेलं.

रिपोन व एंतुलीमध्ये नेमका कशावरून वाद झाला ते अद्याप समजू शकलेलं नाही. तसेच हा राडा एवढ्यावरच थांबला नाही. पंचांनी मध्यस्थी करून सामना परत सुरू केला. तीन चेंडू झाल्यानंतर एंतुलीने फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवला आणि रिपोनच्या दिशेने भिरकावला. हा चेंडू रिपोने अडवला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समालोचक काय म्हणाले?

या सामन्यावेळी समालोचन करणारे नाबिल कैसर म्हणाले, “हे अस्वीकार्य आहे. बऱ्याचदा खेळाडूंमध्ये बाचाबाची होते. मात्र अशा प्रकारे धक्काबुक्की झालेली मी पाहिली नाही. एंतुलीने रिपोनचं हेल्मेट पकडून ओढलं. आता सामनाधिकारी या खेळाडूंवर काय कारवाई करतात ते पाहुया. सामनाधिकारी या घटनेबाबत बांगलादेश क्रिकेट बोर्ड व क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला आपला अहवाल सोपवतील”.