भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी २०१६ हे वर्ष सर्वात यशस्वी ठरले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. गेल्या वर्षात विराट सर्वाधिक धावा ठोकणारा क्रिकेटपटू ठरला. याशिवाय कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकली आणि कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान कायम ठेवले. यंदाच्या वर्षात देखील आणखी चांगली कामगिरी करण्याचा विराट कोहलीचा मानस आहे. फिटनेसच्या बाबतीत कोहली अनेक क्रिकेटपटूंना प्रेरणास्थान ठरणारा आहे. खुद्द कोहलीनेही आपल्या उल्लेखनीय कामगिरीचे श्रेय फिटनेसला दिले. त्यामुळे नवीन वर्षात फिटनेसकडे आणखी लक्षकेंद्रीत असल्याचे कोहलीने ठरवले आहे. कोहलीने नुकताच ट्विटर आणि इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून व्हिडिओमध्ये त्याने आपले नवीन वर्षाचे संकल्प सांगितले आहेत. जिममधील कसून व्यायामानंतर चित्रीत केलेल्या या व्हिडिओमध्ये कोहलीने यंदाच्या वर्षात कोणतीही कारणे न देता फिटनेसवर आणखी भर देणार असल्याचे म्हटले आहे.
कसोटी मालिकेनंतरच्या जवळपास महिनाभराच्या विश्रांतीनंतर भारतीय संघ आता १५ जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. महिन्याभराची विश्रांती मिळाली असली तरी फिटनेस आणि सरावाकडे दुर्लक्ष करता येत नाही, असेही कोहीलने सांगितले. २०१६ प्रमाणेच यंदाचे वर्ष देखील कोहलीसाठी नवी उंची गाठणारे ठरेल अशी भारतीय चाहत्यांना आशा आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी दोन हात करणार असून वर्षाच्या अखेरीस द.आफ्रिकेचा दौरा देखील नियोजित आहे.
Couldn't be a better resolution than to get fitter from inside out. Work hard at something every day ✌?? pic.twitter.com/loMSpfBOv2
— Virat Kohli (@imVkohli) January 2, 2017