टेनिसच्या निमित्ताने अनेक देश हिंडलो मात्र येथील डेक्कन जिमखान्याच्या कोर्टवर रशियाविरुद्ध चाळीस वर्षांपूर्वी झालेल्या डेव्हिस चषक सामन्याच्या आठवणी माझ्यासाठी अजूनही ताज्याच आहेत हे उद्गार व्यक्त केले आहेत ज्येष्ठ डेव्हिसपटू व टेनिस समालोचक विजय अमृतराज यांनी.
चॅम्पियन टेनिस लीगचे संस्थापक या नात्याने येथे पुणे फ्रँचाईजीच्या बोधचिन्हाच्या अनावरण समारंभानिमित्त ते आले होते. १९७४ मध्ये येथे भारतीय संघाने रशियाविरुद्ध विजय मिळवित डेव्हिस चषक स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. त्या वेळी भारतीय संघात आनंद व विजय या अमृतराज बंधूंचा समावेश होता. या बंधूंनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीमुळेच भारतास हा सामना जिंकता आला होता.
या सामन्याच्या आठवणी पुन्हा जागृत करताना अमृतराज म्हणाले, हा सामना पाहण्यासाठी भरपूर प्रेक्षक उपस्थित होते. रशियन संघात आमच्यापेक्षा खूप अनुभवी व मानांकित खेळाडूंचा समावेश होता. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला गेला होता. मात्र आनंद याने खूपच छान खेळ केला. आम्ही सर्वच खेळाडूंनी जिद्दीने या सामन्यात विजयश्री खेचून आणली. त्यामुळे पहिल्यांदाच भारतास डेव्हिस स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान मिळाले होते.
आता टेनिसपटूंना भरपूर सुविधा व सवलती मिळत आहेत. आमच्या वेळी मुळातच क्रीडा क्षेत्राविषयी फारशी जागृती नव्हती. त्यावेळी क्रिकेटलादेखील थोडीशी प्रसिद्धी मिळत असे. साहजिकच बाकीचे खेळ तर प्रसिद्धीपासून खूप लांब होते. एक मात्र निश्चित की आम्ही डेव्हिस चषक स्पर्धेत एकदिलाने खेळायचो. देशासाठी खेळताना उर भरून यायचा आणि खेळाचाही मनमुरादपणे आम्ही आनंद घ्यायचो असेही अमृतराज म्हणाले.
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने देशासाठी खेळणाऱ्यांनाच शासनाची मदत देण्याचे जाहीर केले आहे. त्याविषयी विचारले असता अमृतराज म्हणाले, शासनाचा निर्णय योग्यच आहे. जेव्हा कोणतीही उद्योगसंस्था तुम्हाला पुरस्कृत करीत असते, त्यावेळी त्यांनी ज्या काही अटी दिलेल्या आहेत, त्या पाळणे तुमच्यावर बंधनकारक आहे. शासनाने जर एखाद्या स्पर्धेसाठी खेळाडूंना आर्थिक सहकार्य केले असेल तर या खेळाडूंनी आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करायला पाहिजे. देशासाठी खेळण्याचा मान मिळणे ही तर खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. खेळाडूंनी आशियाई, राष्ट्रकुल व ऑलिम्पिकसारख्या स्पर्धाना प्राधान्य दिले पाहिजे कारण देश आहे म्हणून आपण आहोत. वैयक्तिक स्पर्धासाठी आवश्यक असणारे मानांकन गुण तुम्हाला अन्य अनेक स्पर्धामध्ये मिळू शकतात. मात्र या प्रतिष्ठेच्या स्पर्धा चार वर्षांतून एकदाच येत असतात.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay amritraj sharing his memories about davis cup
First published on: 12-11-2014 at 02:25 IST