लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावणाऱ्या विजय कुमारने जागतिक नेमबाजी क्रमवारीत सर्वोत्तम दुसरे स्थान पटकावले आहे. मात्र लवकरात लवकर अव्वल स्थानी झेप घेण्याची इच्छा पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात खेळणाऱ्या विजय कुमारने व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट्स फेडरेशनने मंगळवारी क्रमवारीची यादी जाहीर केली.
‘‘लवकरात लवकर मला अव्वल स्थान गाठायचे आहे. पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यानंतरच माझे उद्दिष्ट साध्य होऊ शकते. या स्पर्धेत मी माझी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे,’’ असे विजयने सांगितले. विजयने गेल्या काही वर्षांपासून अव्वल १० जणांच्या यादीत आपले स्थान कायम राखले होते. २००९मध्ये त्याने पहिल्यांदा दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली होती. विजय कुमारने २६६५ गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा क्युबाचा नेमबाज प्युपो लेउरिस ३३६४ गुणांसह अव्वल स्थानी आहे.
‘‘जागतिक स्पर्धेसाठी माझा जोरदार सराव सुरू आहे,’’ असेही त्याने सांगितले. पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता नेमबाज गगन नारंग याने एका क्रमांकाच्या सुधारणेसह पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. पुरुषांच्या ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात जॉयदीप कर्माकरने सहावे स्थान कायम राखले आहे. डबल ट्रॅप प्रकारातील नेमबाज रंजन सोधी सातव्या स्थानी आहे.