भरगच्च वेळापत्रकाबाबत जागतिक संघटनेवर टीका चुकीची!

करोनामुळे क्रीडा क्षेत्रासह बॅडमिंटनसमोर असलेल्या आव्हानांबाबत विमल कुमार यांच्याशी केलेली खास बातचीत –

संग्रहित छायाचित्र

विमल कुमार, बॅडमिंटन प्रशिक्षक

सुप्रिया दाबके

करोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बॅडमिंटन स्पर्धाचे यंदा आखण्यात आलेले वेळापत्रक भरगच्च असले तरी कोणत्या स्पर्धेमध्ये खेळायचे हे ठरवण्याचा अधिकार खेळाडूंना आहे. भरगच्च वेळापत्रकाबाबत जागतिक बॅडमिंटन महासंघावर (बीडब्ल्यूएफ) टीका करणे चुकीचे असून महिन्यातून एक स्पर्धा खेळा आणि ती जिंका, असे मत भारताचे माजी बॅडमिंटन प्रशिक्षक आणि बेंगळूरुतील प्रकाश पदुकोन बॅडमिंटन अकादमीचे संचालक विमल कुमार यांनी व्यक्त केले.

‘‘विश्वचषक फुटबॉल स्पर्धा किंवा ऑलिम्पिक ही चार वर्षांतून एकदा खेळवण्यात येते. या जागतिक स्तरावरील स्पर्धामुळे संपूर्ण जगात एक वेगळाच उत्साह आणि सकारात्मकता असते. त्यामुळे यासारख्या स्पर्धा रद्द होणे योग्य नाही,’’ असे विमल कुमार म्हणाले. करोनामुळे क्रीडा क्षेत्रासह बॅडमिंटनसमोर असलेल्या आव्हानांबाबत विमल कुमार यांच्याशी केलेली खास बातचीत –

*  टोक्यो ऑलिम्पिकला प्रायोजक राहतील की नाही, याबाबत चर्चा आहे. ऑलिम्पिक होण्याबाबत काय वाटते?

चार वर्षांतून एक वेळाच ऑलिम्पिक स्पर्धा होते. बॅडमिंटन, जलतरण यांसारख्या प्रत्येक खेळातील खेळाडूंसाठी ऑलिम्पिक हे लहानपणापासूनचे स्वप्न असते. त्यातच खेळाडूंचे वय हे खेळासाठी मर्यादित असते. या स्थितीत जर एखादी ऑलिम्पिक स्पर्धा रद्द झाली तर त्याचा कोणत्याही खेळातील खेळाडूला धक्का बसणे स्वाभाविक असते. ऑलिम्पिक, विश्वचषक फुटबॉल यांसारख्या स्पर्धा संपूर्ण जगात एक वेगळाच उत्साह घेऊन येत असतात. त्यामुळे त्या स्पर्धा रद्द करणे सोपे नाही.  जपानसारखा देश टोक्यो ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी गेल्या वर्षीच पूर्णपणे सज्ज होता. करोनामुळे आर्थिक मंदी असली तरी अजूनही जपानने ऑलिम्पिक पुढील वर्षी आयोजित करण्याची दाखवलेली जिद्द वाखाणण्याजोगी आहे. प्रायोजकांवरून चर्चा होत असली तरी जपान ऑलिम्पिकचे यशस्वी आयोजन करण्याचा प्रयत्न करेल याची खात्री आहे.

* बॅडमिंटनच्या नवीन वेळापत्रकाकडे खेळाडूंनी कसे पाहावे?

जागतिक बॅडमिंटन महासंघ करोनाच्या काळात वेळापत्रकाची नव्याने आखणी करून खेळ सुरू करण्याचा विश्वास दाखवणारी जगातील पहिली क्रीडा संघटना आहे. जेव्हा स्पर्धेचे वेळापत्रक आखण्यात येते, तेव्हा ते समोर ठेवून खेळाडू सरावाला सुरुवात करतात. बॅडमिंटनच्या स्पर्धाचे यंदा आखण्यात आलेले वेळापत्रक भरगच्च आहे, परंतु खेळाडू वर्षांतून किमान १५ स्पर्धा या खेळतातच. वेळापत्रकाप्रमाणे स्पर्धा होतील की नाही, हे सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सांगणे अवघड आहे. मात्र बॅडमिंटनपटूंना सरावाच्या दृष्टीने संधी स्पर्धाच्या वेळापत्रकामुळे मिळाली आहे.

* बेंगळूरुच्या प्रकाश पदुकोन बॅडमिंटन अकादमीत सराव सुरू झाला आहे. त्या दृष्टीने कोणती काळजी घेण्यात येते?

खेळाडूंचा सरावासाठी प्रवेश होण्यापूर्वी त्यांचे तापमान तपासण्यात येते तसेच त्यांना सर्दी, खोकला यांसारखी लक्षणे नाहीत ना हे बघण्यात येते. मात्र खेळण्याच्या पद्धतीत बदल करणे अशक्य आहे. खेळण्याच्या जागेवर सतत स्वच्छता आमच्याकडून ठेवण्यात येते. निर्जंतुकीकरणाची साधने खेळाडूंसाठी उपलब्ध आहेतच. कपडे बदलण्याच्या ठिकाणीही खेळाडूंना जास्त वेळ राहण्यास मज्जाव आहे. खेळाडू जेव्हा त्यांच्या घरी जातात, तेव्हादेखील सुरक्षित अंतर राखण्याच्या दृष्टीने मित्रमंडळींमध्ये जाऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे. सराव करताना बॅडमिंटन कोर्टावर थुंकू नका, अशाही सूचना आहेत. आम्ही आमच्याकडून खेळाडूंच्या सुरक्षेची पूर्णपणे काळजी घेतली आहे. मात्र स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी खेळाडूंचीही आहे.

* भारतात क्रीडा स्पर्धाना केव्हा सुरुवात होईल असे वाटते?

करोनाच्या साथीमुळे जोपर्यंत कठोर निर्बंध आहेत, तोपर्यंत क्रीडा स्पर्धाना भारतात सुरुवात होईल असे वाटत नाही. टेनिसबाबत सांगायचे तर नोव्हाक जोकोव्हिचनेही कठोर र्निबधांमुळे अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत खेळण्याबाबत शंका व्यक्त केली आहे. भारतासारख्या देशात अजून व्यावसायिक जलतरणपटूंनादेखील सराव करण्यास परवानगी देण्यात आली नाही. क्रीडा मंत्रालयाकडून खेळाडूंना सरावाची परवानगी अनेक ठिकाणी देण्यात आली असली तरी अजून कोणत्याही खेळांच्या स्पर्धाबाबतचा निर्णय यायला वेळ लागेल असे वाटते. त्यातच भारतात सध्या खेळ ही निश्चितच पहिली पसंती नाही. ‘आयपीएल’संबंधी चर्चा सुरू आहे, मात्र अन्य क्रीडा स्पर्धा भारतात कधी आयोजित होणार याबाबत कुठे काहीच बोलले जात नाही हे वास्तव आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Vimal kumar badminton instructor interview abn