पदार्पणातील सामन्यात पहिल्या डावामध्ये केलेले शतक हा काही चमत्कार नव्हता याचाच प्रत्यय घडवीत सलामीवीर विराग आवटे याने दुसऱ्या डावातही शैलीदार शतक झळकाविले, त्यामुळेच विदर्भविरुद्धचा रणजी क्रिकेट सामना अनिर्णीत ठेवण्यात महाराष्ट्रास यश मिळाले. हा सामना नागपूर येथे झाला.
आवटे या ३१ वर्षीय खेळाडूने पहिल्या डावात झुंजार शतक टोलवीत पदार्पण गाजविले होते. मंगळवारी शेवटच्या दिवशीही त्यानेच वर्चस्व गाजविले. त्याने दुसऱ्या डावात १७ चौकार व एक षटकारासह १०८ धावा केल्या आणि कर्णधार रोहित मोटवानी याच्या साथीत चौथ्या विकेटसाठी १२६ धावांची भागीदारी केली. मोटवानी याने कर्णधारास साजेसा खेळ करीत ६६ धावा केल्या. त्यामध्ये एक षटकार व चार चौकारांचा समावेश होता. या दोन्ही फलंदाजांच्या खेळामुळेच महाराष्ट्राने दुसऱ्या डावात ७ बाद २५७ धावा करीत डाव घोषित केला आणि विदर्भपुढे विजयासाठी २७४ धावांचे आव्हान ठेवले. उर्वरित खेळांत विदर्भने २९ षटकांत १ बाद १०३ धावा केल्या. त्यामध्ये उर्वेश पटेल याने सात चौकारांसह नाबाद ५४ धावा केल्या. महाराष्ट्रास या सामन्यात पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर तीन गुणांची कमाई झाली.
 संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र (पहिला डाव) : २८२
विदर्भ (पहिला डाव) : २६६
महाराष्ट्र (दुसरा डाव) : ७ बाद २५७ धावा घोषित (विराग आवटे १०८, रोहित मोटवानी ६६, साईराज बहुतुले ३/४७)
विदर्भ (दुसरा डाव) :  १ बाद १०३ (शिवसुंदर दास नाबाद ३६, उर्वेश पटेल नाबाद ५४)    

दोन शतकांचा आनंद वेगळाच : विराग
पदार्पणातील सामन्यात दोन्ही डावांमध्ये शतक टोलविल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. तिशी ओलांडल्यानंतर महाराष्ट्र संघात स्थान मिळाल्यानंतर आपल्या क्षमतेइतकी कामगिरी करण्याचे माझे ध्येय होते आणि मी सकारात्मक वृत्तीने खेळलो त्यामुळेच मी दोन्ही डावात शतक करु शकलो, असे विराग आवटे याने ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीस सांगितले. तो पुढे म्हणाला,की या यशाचे श्रेय मला सतत प्रोत्साहन देणारे माझे कुटुंबीय तसेच भरत मारवाडी, सुनील काटे, शंतनु सुगवेकर या प्रशिक्षकांना द्यावे लागेल. विस्टाकोअर कंपनीत मी नोकरी करीत आहे. तेथेही मला खूप सवलती मिळतात, त्यामुळेच माझी क्रिकेट कारकीर्द बहरली आहे.
महाराष्ट्रास या सामन्यात विजय मिळवून देण्याचे माझे स्वप्न साकार झाले नसले तरी उर्वरित सामन्यांमध्ये मी त्यासाठी निश्चित अधिक प्रयत्न करणार आहे, असेही विराग याने सांगितले.