भारत आणि इंग्लंड दरम्यान मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट स्टेडियमवरती तिसरा एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि स्फोटक फलंदाज, विराट कोहलीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. मात्र, कोहलीने आपल्या चाहत्यांना पुन्हा एकदा नाराज केले आहे. आजच्या (१७ जुलै) एकदिवसीय सामन्यात तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही डावांमध्ये एकाच पद्धतीने बाद होण्याची चूक करत आहे.

ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट स्टेडियमवरती सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली अवघ्या १७ धावा करून बाद झाला. रीस टॉपलीने जोस बटलरकरवी त्याला बाद केले. विराट ज्या चेंडूवरती बाद झाला तो चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणारा होता. गेल्या काही डावांमध्ये तो अनेकदा अशाच प्रकारे बाद झाला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी आता त्याच्यावर टीका सुरू केली आहे.

एका चाहत्याने विराटला पुन्हा एकदा आपल्या बालपणीच्या प्रशिक्षकाकडे जाण्याचा सल्ला दिला आहे. या चाहत्याच्या म्हणण्यानुसार, ‘विराट कोहलीसारखा दिग्गज खेळाडू एकाच प्रकारची चूक वारंवार कशी करू शकतो? मान्य आहे फॉर्म ही अल्पकालीन गोष्ट आहे. पण, तरीदेखील त्याला बालपणीच्या प्रशिक्षकांकडून पुन्हा एकदा आपल्या कौशल्यांवरती काम करण्याची गरज आहे. असे केल्यास नक्की त्याला फायदा होईल.’

हेही वाचा – “प्रत्येकाने अर्णब गोस्वामीसारखा विदुषक….”, ललित मोदीचे माध्यमांवर तोंडसुख

एकदिवसीय क्रिकेटमधील गेल्या पाच डावांमध्ये विराट कोहली २०धावांचाही आकडा गाठू शकलेला नाही. पाच डावांमध्ये तो ८, १८, ०, १६ आणि १७ अशा धावा करून बाद झाला आहे. त्याच्या या कामगिरीमुळे एका क्रिकेट चाहत्याने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाही लक्ष केले आहे. ‘राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली विराट कोहलीसारखा फलंदाज चुकांची पुनरावृत्ती करूच कशी शकतो?’ असा प्रश्न या चाहत्यांने उपस्थित केला आहे.