भारत-इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीत इंग्लंडने भारतावर सामन्याच्या चौथ्याच दिवशी ३१ धावांनी विजय मिळवला. १९४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव १६२ धावांवर आटोपला. या विजयासह इंग्लंडने ५ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. त्यामुळे पुढील ४ सामन्यांमध्ये भारताला चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे. या सामन्यात विराट कोहलीने पहिल्या डावात १४९ धावा केल्या तर दुसऱ्या डावात झुंजार अर्धशतकी खेळी केली.

पहिल्या कसोटीआधी इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी बळी टिपणाऱ्या जेम्स अँडरसन याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. सामन्यात विराट विरुद्ध अँडरसन असा सामना रंगेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. तसा सामना रंगलादेखील. पण त्यात म्हणावी तशी गोलंदाजी करणे अँडरसनला शक्य झाले नाही. त्यामुळे आता अँडरसनने विराटला बाद करण्यासाठी एक नवी युक्ती शोधून काढली आहे. एका मुलाखतीत त्याने याबाबत माहिती दिली.

‘मी विराटला चांगली गोलंदाजी केली. माझ्या योजनेनुसार माझी गोलंदाजी झाली. या सामन्यात त्याने काही ऑफ स्टम्पच्या बाहेरील चेंडूला बॅट लावायचा प्रयत्न केला. तसेच, त्याचे काही झेलही सुटले. त्यामुळे कोहलीला पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकता आले. पण महत्वाचे म्हणजे पहिल्या डावात १४९ धावांपैकी त्याला केवळ १७ धावा माझ्या गोलंदाजीवर करण्यात आल्या. मी त्याला बाद करू शकलो नाही, पण पुढील सामन्यासाठी मी त्याला बाद करण्याच्या नव्या युक्त्या शोधल्या असून त्यानुसार मी त्याला गोलंदाजी करणार आहे, असेही अँडरसनने नमूद केले.