विराट कोहली आणि मीराबाई चानूला खेलरत्न; महाराष्ट्राची नेमबाज राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार तर कुस्ती प्रशिक्षक दादू चौगुले यांना ध्यानचंद पुरस्कार; पुरस्कार नाकारल्याने कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि तिरंदाजी प्रशिक्षक जीवनज्योतसिंग यांची नाराजी

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि विश्वविजेती वेटलिफ्टिंगपटू मिराबाई चानू यांना देशाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राची अव्वल नेमबाज राही सरनोबतला अर्जुन  पुरस्कार तर महाराष्ट्र केसरी माजी कुस्तीपटू व प्रशिक्षक दादू चौगुले यांना ध्यानचंद पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हे पुरस्कार जाहीर झाल्याने एकीकडे आनंदाला उधाण आले असतानाच तिरंदाजी मार्गदर्शक जीवनजोतसिंग तेजा यांना द्रोणाचार्य तर बजरंग पुनियाला खेलरत्न पुरस्कारापासून वंचित राखले गेल्याने या पुरस्कारांना वादविवादाची किनारदेखील लाभली आहे.

निवड समितीच्या शिफारशीनंतर केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी मंजुरी दिल्यामुळे २५ सप्टेंबरला राष्ट्रपती भवनात एका शानदार सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या खेळाडूंना सन्मानित करण्यात येणार आहे. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (१९९७) आणि विश्वविजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनी (२००७) यांच्यानंतर खेलरत्न पुरस्कार मिळवणारा कोहली हा तिसरा क्रिकेटपटू ठरणार आहे. गेल्या वर्षी ४८ किलो वजनी गटात विश्वविजेतेपद आणि विश्वविक्रम नोंदवण्याचा पराक्रम चानूने केला होता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी फलंदाजांच्या यादीत कोहली अव्वल स्थानावर आहे. गेली तीन वष्रे तो दमदार आणि सातत्यपूर्ण फलंदाजी करीत आहे. २०१६ आणि २०१७मध्येही त्याला नामांकन मिळाले होते. २९ वर्षीय विराटने ७१ कसोटी सामन्यांत २३ शतकांसह ६१४७ धावा केल्या आहेत. त्याचप्रमाणे २११ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३५ शतकांसह ९७७९ धावा काढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शंभर शतके झळकावणाऱ्या सचिननंतर या पंक्तीत दुसऱ्या स्थानावर विराट (५८ शतके) आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेतील सुवर्णपदक विजेत्या चानूला पाठीला झालेल्या दुखापतीमुळे आशियाई क्रीडा स्पध्रेला मुकावे लागले होते. मात्र २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये चानूकडून भारताला पदकाच्या अपेक्षा आहेत.

पुरस्कार जाहीर झाल्यानंतर नाराज झालेल्यांमध्ये द्रोणाचार्य पुरस्कारासाठी नामांकित तिरंदाजी प्रशिक्षक जीवनज्योतसिंग यांचा समावेश आहे. मात्र २०१५ साली कोरियात झालेल्या विश्व विद्यापीठ स्पर्धेतील बेशिस्त वर्तनाबद्दल त्यांच्यावर घातली गेलेली एक वर्षांची बंदी त्यांना या पुरस्कारापासून वंचित राखणारी ठरली, तर आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णविजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाचे नाव निवड समितीनेच पुढे न पाठवल्याने त्याने थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा स्वीकारलेला पवित्रा यामुळे यंदाचे पुरस्कारदेखील वादात सापडण्याची चिन्हे आहेत.

जीवनज्योतसिंग तेजा यांना द्रोणाचार्य द्यावा!

तिरंदाजी प्रशिक्षक जीवनज्योतसिंग तेजा यांना त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल द्रोणाचार्य पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे, अशी विनंती करणारे पत्र अर्जुन पुरस्कारप्राप्त आघाडीचे तिरंदाज अभिषेक वर्मा आणि रजत चौहान यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिले आहे.

न्या. मुकुल मुद्गल यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीच्या वतीने द्रोणाचार्य पुरस्कारासाठी तेजा यांचे नाव सुचवण्यात आलेले होते. मात्र एका प्रकरणात बेशिस्त वर्तन केल्याच्या घटनेची नोंद घेत क्रीडा मंत्रालयाने त्यांचे नाव रोखून धरल्याचे बोलले जात आहे. ते अनेक तिरंदाजांसाठी प्रोत्साहनाचा स्रोत असून, २०१३ पासून आमच्यासारख्या तिरंदाजांसाठी एक आधारस्तंभ आहेत. त्यांच्या कामगिरीला न्याय देऊन तिरंदाजांचा उत्साह द्विगुणित करावा, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. महिला तिरंदाज व्ही. ज्योती सुरेखा यांनी या पत्राची प्रत केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनादेखील पाठवली आहे. पत्रावर स्वाक्षरी असलेल्या तिरंदाजांपैकी अभिषेक वर्मा आणि रजत चौहान हे दोघेही अर्जुन पुरस्काराने सन्मानित खेळाडू असल्याने त्यांच्या विनंतीपत्राला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

बजरंगची न्यायालयात जाण्याची तयारी

क्रीडापटूंसाठी सर्वोच्च सन्मानाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार नाकारला गेल्याने नाराज झालेला कुस्तीपटू बजरंग पुनियाने शासनाच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. यंदाच्या वर्षी ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत आणि जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या बजरंग याचे नाव कुस्ती महासंघाच्या वतीने खेलरत्न पुरस्कारासाठी नामनिर्देशित करण्यात आले होते. दरम्यान, आपली बाजू मांडण्यासाठी बजरंग स्वत: क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांना भेटणार आहे.

राहीवर अभिनंदनाचा वर्षांव; कोल्हापुरात आनंदाची लाट

कोल्हापूरची नेमबाजीमधील सुवर्णकन्या राही जीवन सरनोबतला क्रीडा प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. तिचे वडील जीवन सरनोबत यांनीही राहीच्या नेमबाजीतील कामगिरीची योग्य नोंद घेऊन केंद्र सरकारने तिच्या कामगिरीचा गौरव केल्याने मनापासून आनंद झाला असल्याचे ‘लोकसत्ता’ला गुरुवारी सांगितले.

२५ मीटर पिस्तूल नेमबाजी स्पर्धेत राहीने ठसा उमटवला आहे. या क्रीडाप्रकारात ती आघाडीची भारतीय महिला खेळाडू आहे. कोल्हापूर येथे तिने नेमबाजीचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले. २००८ सालापासून तिची आंतरराष्ट्रीय कामगिरी खुलत गेली. त्या वर्षी झालेल्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत तिने पहिले सुवर्णपदक मिळविले. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. तिने जकार्ता येथे झालेल्या यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. नवी दिल्लीमध्ये आठ वर्षांपूर्वी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावली होती.

विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय पिस्तूल नेमबाज ठरली. चँगवॉन येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धा तिने जिंकली होती. ग्लासगो येथे २०१४ साली पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पध्रेत तिने पुन्हा सुवर्णपदकाची कमाई केली होती. यशाचा हाच क्रम कायम ठेवत तिने त्याच वर्षी इन्चॉन येथील कांस्यपदक जिंकले. राहीने २०११ सालच्या विश्वचषक स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते, तर २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिकसाठी तिची निवड झाली.

राहीची ताजी कामगिरी म्हणजे यंदाची आशियाई क्रीडा स्पर्धा. मागील महिन्यात तिने या स्पर्धेत सहभागी होत तिच्या आवडीच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात ३४ गुण मिळवून  सुवर्णपदकावर नाव कोरले. तिने थायलंडच्या प्रतिस्पध्र्याला मागे टाकून सुवर्णवेध साधला होता.या यशानंतर ती कोल्हापुरात आल्यावर तिची जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. हा आनंददायी प्रसंग ताजा असतानाच आता तिला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याने पुन्हा एकदा करवीरनगरीत आनंदाची लाट पसरली आहे.

खेलरत्न पुरस्कार

  • विराट कोहली (क्रिकेट) आणि मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग)

अर्जुन पुरस्कार

  • नीरज चोप्रा, जिन्सन जॉन्स, हिमा दास (सर्व अ‍ॅथलेटिक्स), एन. सिक्की रेड्डी (बॅडमिंटन), सतीश कुमार (बॉक्सिंग), स्मृती मानधना (क्रिकेट), शुभंकर शर्मा (गोल्फ), मनप्रीत सिंग, सविता पुनिया (दोघेही हॉकी), रवी राठोड (पोलो), राही सरनोबत, अंकुर मित्तल, श्रेयशी सिंग (सर्व नेमबाजी), मनिका बत्रा, जी. साथीयान (दोघेही टेबल टेनिस), रोहन बोपण्णा (टेनिस), सुमीत (वेटलिफ्टिंग), पूजा कडियान (वुशू), अंकुल धामा (पॅराअ‍ॅथलेटिक्स, मनोज सरकार (पॅराबॅडमिंटन)

द्रोणाचार्य पुरस्कार

  • छेनंदा अछैय्या कुटप्पा (बॉक्सिंग), विजय शर्मा (वेटलिफ्टिंग), ए. श्रीनिवास राव (टेबल टेनिस), सुखदेव सिंग पन्नू (अ‍ॅथलेटिक्स), क्लेरेन्स लोबो (हॉकी), तारक सिन्हा (क्रिकेट), जीवनकुमार शर्मा (ज्युडो), व्ही. आर. बिडू (अ‍ॅथलेटिक्स)

राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार

  • राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड, २. जेएसडब्ल्यू स्पोर्ट्स, ३. इशा आऊटरीच.

मौलाना अब्दुल कलाम आझाद पुरस्कार

  • गुरुनानक देव विद्यापीठ, अमृतसर

ध्यानचंद पुरस्कार

  • सत्यदेव प्रसाद (तिरंदाजी), भरत छेत्री (हॉकी), बॉबी अलॉयसिस (अ‍ॅथलेटिक्स), दादू चौगुले (कुस्ती)