Virat Kohli Post for Mohammed Siraj: भारताच्या ओव्हल कसोटी विजयाचा शिल्पकार मोहम्मद सिराज ठरला. ओव्हल कसोटीत सिराजने दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजच्या या कामगिरीने त्याने संपूर्ण देशातील चाहत्यांची मनं जिंकली आहेत. विराट कोहलीने देखील भारताच्या विजयानंतर पोस्ट शेअर करत संघाचं कौतुक केलं आहे. तर मोहम्मद सिराजसाठी त्याने खास वाक्य लिहिलं आहे.

मोहम्मद सिरादने ओव्हल कसोटीत ९ विकेट्स घेतले आहेत. सिराजने पाचव्या दिवशी भेदक गोलंदाजी करत इंग्लंडच्या संघाला धावा करू दिल्या नाहीत. सिराजने पाचव्या दिवशी झटपट ३ विकेट्स घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. सिराजने त्याच्या स्पेलमधील प्रत्येक चेंडू चांगल्या लाईन आणि लेंग्थसह टाकत अगदी जीव तोडून गोलंदाजी केली. त्याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताचा विजय निश्चित झाला.

विराट कोहलीने पोस्ट शेअर करत लिहिलं, “टीम इंडियाने शानदार विजय नोंदवला आहे. सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाच्या चिकाटीने आणि जिद्दीने संघाला हा अफलातून विजय मिळवून दिला. विशेषतः सिराजचं विशेष कौतुक, तो संघासाठी सर्वस्व पणाला लावायला कायम तयार असतो. त्याच्यासाठी आज मला खूप आनंद होतोय.” विराटने यापुढे हार्ट इमोजी टाकला आहे.

सिराज आणि विराट कोहलीचं बॉन्डिंग खास आहे. सिराज विराट कोहलीला खूप मानतो. भारतीय संघासह आयपीएलमध्येही सिराज आणि विराट आरसीबीच्या संघामध्ये अनेक वर्षे एकत्र खेळले आहेत. आयपीएल २०२५ पूर्वी मोहम्मद सिराज आरसीबीकडून गुजरात टायटन्सच्या संघात गेला. यादरम्यान विराटविरूद्ध गोलंदाजी करताना सिराज मैदानातच भावूक झाला होता. याचा व्हीडिओही व्हायरल झाला होता.

मोहम्मद सिराजच्या ओव्हल कसोटीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. टीम इंडियाचे चाहते, आजी माजी खेळाडू आणि जगभरातील सर्वच माजी खेळाडू भारतीय संघाच्या आणि मोहम्मद सिराजच्या कामगिरीचं कौतुक करत आहेत. मोहम्मद सिराजला या सामन्यात प्रसिध कृष्णानेही चांगली गोलंदाजी करत साथ दिली.