भारताचा कर्णधार विराट कोहली हा आधुनिक क्रिकेटमधील एक उत्तम फलंदाज आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ या दोघांबरोबर त्याची नेहमी तुलना केली जाते. महत्त्वाची बाब म्हणजे हे दोन फलंदाजदेखील त्याची स्तुती करतात. IPL मध्येदेखील गेले काही वर्षे कोहलीची दमदार कामगिरी सुरूच आहे. अशा वेळी कोहली हा इतर फलंदाजांपेक्षा अधिक यशस्वी का आहे याचं कारण भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर याने सांगितले आहे.

विराट कोहली हा इतर फलंदाजांपेक्षा वेगळा आहे. रोहित शर्माचे उदाहरण पाहा. त्याला कोहलीसारख्या सातत्याने एकेरी-दुहेरी धावा काढता येत नाहीत. रोहित शर्मा मोठे आणि हवाई फटके मारू शकतो, पण विराटसारख्या एकेरी धावा काढणे त्याला तितकेसे शक्य होत नाही. ख्रिस गेलसारखा महान खेळाडूदेखील यात कमी पडतो. इतकेच नव्हे, तर एबी डीव्हिलियर्ससारखा चपळ खेळाडूदेखील फिरकीपटूंविरोधात एकेरी धावा घेण्यात मागे पडतो. विराट मात्र एकेरी धावा घेण्यात पारंगत आहे, म्हणूनच विराटच्या कामगिरीत सातत्य दिसून येते”, असे गौतम गंभीरने क्रिकेट कनेक्टेड चॅट शो मध्ये सांगितले.

विराटच्या नेतृत्वावर केली टीका

“तुम्ही स्वतःसाठी धावा काढणं सुरु ठेवू शकता. पण भरपूर धावा करुनही संघाला महत्वाची स्पर्धा जिंकवून न देऊ शकलेले अनेक खेळाडू तुम्हाला सापडतील. सध्याच्या घडीला विराट कोहलीने कर्णधार म्हणून अद्याप काहीही साध्य केलेलं नाही. त्याला खूप शिकायची गरज आहे. तो धावा काढेल, शतकं ठोकेल, हे सारं सुरु राहिलं; पण क्रिकेटमध्ये जोपर्यंत तुम्ही कर्णधार म्हणून महत्वाच्या स्पर्धा जिंकत नाहीत, तोवर तुमच्या कारकिर्दीला फारसा अर्थ उरत नाही.” अशा शब्दात त्याने विराटच्या नेतृत्वशैलीवर टीका केली.