नीचपणाचा कळसच..! विराटच्या दहा महिन्यांच्या मुलीलाही विकृतांनी केलं ट्रोल; पाकिस्तानचा इंझमामही भडकला

पाकिस्तानविरुद्धच्या दारुण पराभवानंतर काही धर्मांधांनी शमीला लक्ष्य केलं. विराटनं शमीला पाठिंबा दिल्यानंतर…

Virat kohlis daughter gets threats after he supports mohammed shami
विराट कोहली, मोहम्मद शमी आणि इंझमाम उल हक

सध्या सुरू असलेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून १० गड्यांनी पराभव पत्करला. हा दारुण पराभव जिव्हारी लागल्यानंतर काही धर्मांधांनी सोशल मीडियावरून भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला लक्ष्य केले. मात्र, भारताच्या अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी, तसेच सर्वसामान्य क्रिकेट रसिकांनीही भारताच्या या गुणी गोलंदाजाची एकदिलाने पाठराखण केली. विराट कोहलीनेही शमीला पूर्णपणे पाठिंबा दिला. लक्ष्य’ करणाऱ्या धर्मांधांना विराटने खडसावले आणि एखाद्या व्यक्तीला त्याच्या धर्मामुळे लक्ष्य करणे अतिशय निंदनीय असल्याचे मत दिले. विराटच्या या वक्तव्यानंतर काही विकृतांनी असभ्यपणे त्याच्या दहा-वर्षाच्या मुलीला लक्ष्य केले

सोशल मीडियावर या विकृतांनी विराटवर राग व्यक्त करताना त्याच्या दहा महिन्यांच्या मुलीलाही सोडले नाही. सोशल मीडियावर अनेकांनी विराटच्या मुलीवर अर्वाच्य भाषेत व्यक्त झाले. या दरम्यान सोशल मीडियावर व्यक्त होताना पातळी कशी सोडली जाते, हे या ट्रोलर्सकडून पाहायला मिळाले. असंवेदनशील टिप्पण्या आणि शिवीगाळ याचा परमोच्च बिंदू गाठल्यानंतर काहींनी या ट्रोलर्सला चांगलेच धारेवर धरले आहे.

इंझमामचीही टीका

या घटनेनंतर पाकिस्तानचा माजी कप्तान इंझमाम उल हकही भडकला. ”विराटच्या मुलीला धमकी देण्याचे वृत्त माझ्या कानी आले आहे. हा एक खेळ आहे, हे लोकांनी समजून घेतले पाहिजे. विराटच्या नेतृत्वावर टीका करण्याचा हक्क तुम्हाला आहे, पण त्याच्या कुटुंबीयाकडे कोणीच बोट दाखवू शकत नाही. विराटबाबत झालेली ही गोष्ट पाहून वाईट वाटले”, असे इंझमामने म्हटले.

हेही वाचा – T20 WC : भारताच्या पराभवानंतर भडकला गौतम गंभीर; म्हणाला, ‘‘मानसिकदृष्ट्या विराट कमकुवत, त्याला…”

भारतीय नियामक क्रिकेट मंडळ (बीसीसीआ) आजी-माजी खेळाडू मोहम्मद शमीच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले होते. त्यानंतर विराटही मोहम्मद शमीच्या समर्थनार्थ मैदानात उतरला. “आमचे लक्ष्य बाहेरच्या ड्रामेबाजीवर नाही. आम्ही पूर्णपणे सामन्यावर लक्ष्य केंद्रित करत आहोत. कुणावरही धर्माच्या आधारावर निशाणा साधणे चुकीचे आहे. काही जण सोशल मीडियावर आपली ओळख लपवून या पद्धतीची कृत्य करतात. आता हे सर्व रोजचेच झाले आहे.”

विराट पुढे म्हणाला, ”हा जीवनातील सर्वात खालचा स्तर असून अशा पद्धतीने त्रास दिला जातो. आम्ही आमच्या ड्रेसिंग रुममधले वातावरण खेळमेळीचे ठेवतो. बाहेर जो काही ड्रामा सुरु आहे, तो पूर्णपणे त्यांच्या चुका दाखवत आहे. मी कधीच कुणासोबत असा भेदभाव केला नाही. काही लोकांचे फक्त हेच काम असते. जर कुणाला मोहम्मद शमीचे खेळातील योगदान दिसत नसेल, तर मी माझा वेळ वाया घालवू इच्छित नाही”, असे विराटने म्हटले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Virat kohlis daughter gets threats after he supports mohammed shami adn

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी
ताज्या बातम्या