स्विडलरने बरोबरीत रोखले; कर्जाकिनला जेतेपद
पाच वेळा विश्वविजेतेपदाचा ताज पटकावणारा भारताचा दिग्गज विश्वनाथन आनंद विश्वविजेतेपदाच्या शर्यतीतून बाद झाला आहे. दहा वर्षांत पहिल्यांदाच आनंदशिवाय विश्वविजेतेपदाचा सामना रंगणार आहे.
मॉस्को येथे पार पडलेल्या कँडिडेट्स बुद्धिबळ स्पध्रेतील १४व्या फेरीत आनंदला रशियाच्या पीटर स्विडलरने बरोबरीवर समाधान मानण्यास भाग पाडले. युक्रेनच्या सर्जी कर्जाकिन हा विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनचा आव्हानवीर ठरला आहे. त्याने ८.५ गुणासंह जेतेपद पटकावले. नोव्हेंबर महिन्यात जेतेपदाचा सामना रगंणार आहे.
आनंदला शेवटच्या फेरीत स्विडलरवर मात करण्यात अपयश आले. हा डाव ३५व्या चालीत बरोबरीत सुटला. १३व्या फेरीतच आनंद विश्वविजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर ढकलला गेला होता. नेदरलँडच्या अनिष गिरीने चुरशीच्या सामन्यात आनंदला बरोबरी मानण्यास भाग पाडले. कर्जाकिनला अमेरिकेच्या फॅबिआनो कारुआनाशी झुंजावे लागले. या दोघांचे प्रत्येकी साडेसात गुण असल्यामुळे विजयी खेळाडू जेतेपदाची माळ पटकावणार होता. माध्यम गुणांचा विचार करता कर्जाकिनला हा डाव अनिर्णीत ठेवला तरी प्रथम स्थान मिळणार होते. मात्र त्याने हत्ती, उंट व वजीर याच्या साहाय्याने सुरेख डावपेच करीत ४२ व्या चालीस विजय मिळविला. कारुआनाला साडेसात गुणांवर समाधान मानावे लागले. आनंदचेही तेवढेच गुण झाले.
स्विडलर, लिवॉन आरोनियन, हिकारू नाकामुरा व गिरी यांचे प्रत्येकी सात गुण झाले. व्हॅसेलीन तोपालोवला केवळ साडेचार गुण मिळविता आले. गिरीने शेवटच्या डावातही तोपालोवविरुद्ध बरोबरी स्वीकारली. आरोनियनलाही नाकामुरा याच्याविरुद्ध अर्धा गुण स्वीकारावा लागला.