एखाद्या धरणाला पडलेली भेग बुजवल्यावर त्याखाली येणाऱ्या लोकांना किती हायसे वाटत असेल याची कल्पना आज आव्हानवीर मॅग्नस कार्लसनशी दोन पराभवांनंतर बरोबरी साधल्यावर विश्वविजेत्या आनंदच्या चाहत्यांना आली असेल. पण स्वत: आनंद एवढा खूष असेल असे मला वाटत नाही. कारण जसा एकेक दिवस पार पडतो, तसे त्याचे सिंहासनही धोक्यात येत आहे. त्याला गरज आहे ती त्याच्या आशेला संजीवनी देणाऱ्या विजयाची!
पण जगभरातील अनेक पट्टीच्या खेळाडूंना आनंदचा पुन्हा बíलन बचावाविरुद्ध खेळायचा निर्णय पटला नाही. आनंदच्या भात्यात अनेक अस्त्रे आहेत, जी त्याने मॅग्नसच्या जन्माआधीपासून वापरली आहेत. जगातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू असूनही मॅग्नसच्या खेळाची जर कमजोर बाजू म्हणजे त्याला सुरुवातीलाच संकटात सापडण्याची घातक सवय आहे. आनंद अजूनही योग्य सुरुवात करून मॅग्नसला कोडय़ात टाकू शकेल, असे अनेकांचे मत आहे.
आनंदने बíलन बचावाविरुद्ध खेळायचा निर्णय घेतला तो तीन गोष्टींमुळे. एक तर त्याला आव्हानवीर मॅग्नसला आपण घाबरलो आहोत असे दाखवायचे नव्हते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे २०१२ साली मॅग्नसने पांढऱ्या मोहऱ्या घेऊन खेळताना तीन वेळा हीच पद्धत वापरली होती. थोडक्यात जगज्जेता आनंद तरुण मॅग्नसला सांगत होता की आता तू स्वत:विरुद्ध कसा खेळतोस, तेच मला पाहू दे. मग तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंदने याच प्रकारात याच वर्षी व्लादिमिर क्रामनिकसारख्या मातब्बर बुद्धिबळपटूला अवघ्या २७ चालींमध्ये पराभूत केले होते आणि ते पण काही महिन्यांपूर्वीच!
मॅग्नस थोडा वेळ गोंधळून गेला होता, पण त्याने स्वतला सावरून एखाद्या यंत्राप्रमाणे एकापाठोपाठ एक मोहऱ्यांची लढाई सुरू केली आणि आनंदच्या आक्रमणाच्या आशा संपुष्टात आणल्या. पण आता आनंद खूपसा सावरला गेला आहे. त्याने बिनचूक खेळून मॅग्नसला डावात जास्त गुंतागुंत करू दिली नाही. अखेर ३२व्या चालींनंतर डाव बरोबरीत सुटला, त्या वेळी आपण कितीही प्रयत्न केला तरी हातात बरोबरीशिवाय काहीही पडणार नाही, हे तरुण मॅग्नसला कळून चुकले होते.
मंगळवारी आनंदकडे काळ्या मोहऱ्या असतील; पण त्याला आता येईल त्या संधीचा फायदा उठवलाच पाहिजे. भारतीय बुद्धिबळप्रेमी आनंदच्या विजयाची आतुरतेने वाट पाहात आहेत. सोमवारच्या बरोबरीमुळे सावरलेला आनंद त्यांना समाधान मिळवून देईल का?
संग्रहित लेख, दिनांक 19th Nov 2013 रोजी प्रकाशित
आनंदला विजयाची आशा
एखाद्या धरणाला पडलेली भेग बुजवल्यावर त्याखाली येणाऱ्या लोकांना किती हायसे वाटत असेल याची कल्पना आज आव्हानवीर मॅग्नस कार्लसनशी दोन पराभवांनंतर बरोबरी साधल्यावर विश्वविजेत्या आनंदच्या चाहत्यांना आली असेल.
First published on: 19-11-2013 at 04:36 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viswanthan anand hope for victory