टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडे नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण आता नॅशनल क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी असणार आहेत. यापूर्वी हे पद राहुल द्रविड यांच्याकडे होतं. राहुल द्रविड यांची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. यापूर्वी हा पदभार स्वीकारण्यास व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी नकार दिला होता. मात्र बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी त्यांचं मन वळवून त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. इंडिया ए संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर नवी जबाबदारी सांभाळतील, असं बोललं जात आहे.

“लक्ष्मण आपल्या अटींवर नॅशनल क्रिकेट अकादमीचे प्रमुख बनण्यास तयार झाले आहेत. द्रविड आणि लक्ष्मण यांचं क्रिकेटबद्दलचे ज्ञान चांगले आहे आणि टीम इंडिया आणि एनसीएसाठी खूप चांगलं असेल. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांचंही असंच मत आहे. नियुक्तीच्या अटी आणि शर्थींवर काम सुरु आहे. मात्र त्यांनी आतापासूनच एसीएसोबत विचार मांडण्यास सुरुवात केली आहे”, असं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं.

राहुल द्रविड अ‍ॅक्शन मोडमध्ये! म्हणाला, “प्रत्येक खेळाडूला…”

रवि शास्त्री यांच्या जागेवर मुख्य प्रशिक्षकासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी अर्ज केला होता. राहुल द्रविड यांची या पदासाठी नियुक्ती झाली नसती तर लक्ष्मण पर्याय ठरले असते. लक्ष्मण यांना एसीएची जबाबदारी मिळणार असल्याने आयपीएलमधील हैदराबाद संघाचं मार्गदर्शकपद सोडावं लागणार आहे. बीसीसीआयच्या नियमांनुसार एसीएच्या प्रमुखपदी नियुक्ती झाल्यास क्रिकेटमधील आणखी जबाबदारी घेऊ शकत नाही. दुसरीकडे व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी भारतासाठी १३४ कसोटी आणि ८६ एकदिवसीय सामने खेळले आहेत.