राहुल द्रविडची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. नियमित प्रशिक्षक बनल्यानंतर द्रविडच्या मार्गदर्शनाखाली न्यूझीलंडविरुद्धची आगामी मालिका ही भारताची पहिली मालिका असेल. किवी संघ भारत दौर्‍यावर येणार असून या दरम्यान, ३ टी -२० आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. दरम्यान राहुल द्रविड अ‍ॅक्शनमोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. 

मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आल्यानंतर राहुल द्रविडने सर्व खेळाडूंशी वैयक्तिक संवाद साधला आणि आगामी मालिकेत प्रत्येकाला संधी दिली जाईल, असे आश्वासन दिले. बीसीसीआयने शुक्रवारी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रविडने खेळाडूंशी वन टू वन संभाषण केले म्हणजेच सर्वांना बोलावले आणि सर्वांशी एकांतात संवाद साधला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रविडने प्रत्येक खेळाडूला स्वतंत्रपणे बोलावून त्यांच्या मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीबद्दल विचारले. इतकेच नाही तर द्रविडने तंदुरुस्त वाटत नसल्यास आणि आवश्यक असल्यास विश्रांती घेण्याचेही सांगितले. प्रत्येक खेळाडूला संधी दिली जाणार असल्याचे त्याने सांगितले. तसेच भारतीय क्रिकेट संघाच्या प्रत्येक खेळाडूकडून त्याला काय अपेक्षा आहेत याबद्दलही  द्रविडने संवाद साधला.

न्यूझीलंड संघ टी-२० वर्ल्डकप संपल्यानंतर थेट भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात न्यूझीलंडसोबत कसोटीसोबत तीन टी-२० सामन्यांचेही आयोजन करण्यात आले आहे. जयपूर, रांची आणि कोलकाता येथे टी २० सामने असतील. करोनामुळे भारतात गेल्या काही महिन्यात एकही मालिका झालेली नाही. करोनामुळे आयपीएल आणि वर्ल्डकपचे आयोजनही यूएईत करावे लागले. दुसरीकडे पाकिस्तान आणि न्यूझीलंडने पराभूत केल्याने भारताचे वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आले. त्यामुळे या मालिकेत न्यूझीलंडला पराभूत करत हिशोब चुकता करण्याचा भारताचा प्रयत्न असेल.

या दौऱ्यापूर्वी बीसीसीआय नवीन कोचिंग स्टाफची घोषणा करू शकते. विक्रम राठोर फलंदाजी प्रशिक्षक, टी. दिलीप क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि पारस म्हाम्ब्रे गोलंदाजी प्रशिक्षक असतील. सध्याचे फलंदाजी प्रशिक्षक राठोर त्यांच्या पदावर कायम राहू शकतात. राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक म्हणून आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करेल.

न्यूझीलंड कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ:

अजिंक्य रहाणे (कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशात शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

कसोटी सामने

  • पहिला कसोटी सामना- २५ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर, कानपूर
  • दुसरा कसोटी सामना- ३ डिसेंबर ते ७ डिसेंबर, मुंबई