ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका भारताने २-१ अशी जिंकण्याची किमया साधली. असंख्य वादांमुळे ही मालिका तशी नेहमीच चर्चेत राहिली. प्रामुख्याने विराट कोहली आणि स्टीव्हन स्मिथ यांच्या नेतृत्वाची कसोटी या मालिकेत लागली. याचाच घेतलेला वेध झ्र्

कधी खेळपट्टीची चर्चा, तर कधी वाद, कधी भारताचा कर्णधार विराट कोहलीवर निशाणा तर कधी समेटाची भूमिका या साऱ्या नाटय़मय घटनांमुळे भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेला ‘न भूतो, न भविष्यति’ असे महत्त्व प्राप्त झाले. मालिका संपली, तरी त्याचे कवित्व अद्याप ओसरले नाही. दररोज कुणी न कुणी अजूनही भाष्य करते आहे. प्रसारमाध्यमांना मसालेदार फोडणी देता येईल, असे रुचकर बोलत आहे. या सर्वातून एक मात्र साध्य झाले आहे, ते म्हणजे भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचे महत्त्व वाढले आहे. अगदी व्यावसायिक भाषेत सांगायचे, तर त्याचा ‘टीआरपी’ कमालीचा वाढला आहे. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस मालिका किंवा भारत-पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पध्र्याच्या सामन्यांना काल-परवापर्यंत क्रिकेटच्या व्यासपीठावर बरेच महत्त्व होते. पण आता भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याच्या आकडेवारीने कमालीचा उच्चांक गाठला आहे. ऑस्ट्रेलियाने फक्त विराट कोहली हे एकमेव लक्ष्य समोर ठेवले होते. त्यामुळे कोहलीवर त्यांनी चहुबाजूंनी हल्ला चढवला. पण कोहली अपयशी ठरूनही भारत जिंकला आणि स्टीव्हन स्मिथ यशस्वी ठरूनही ऑस्ट्रेलिया हरला, हे या मालिकेचे वैशिष्टय़ ठरले. म्हणजेच ऑस्ट्रेलियन संघ विराटविरुद्धची लढाई जिंकला, मात्र भारताविरुद्धचे युद्ध हरला!

विराट विरुद्ध स्मिथ

सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर विराट कोहली हळुवारपणे भारतीय क्रिकेटमधील दैवत्वाच्या स्थानाकडे वाटचाल करतो आहे. गेल्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा जरी घेतला तरी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये विराटची सातत्यपूर्ण फलंदाजी, त्याचा आवेश, आक्रमकतेची गुरुकिल्ली या बळावर भारतीय संघ यशाची एकेक शिखरे पादाक्रांत करीत होता. मुगलांना जसे स्वप्नातसुद्धा संताजी-धनाजी दिसायचे, तशीच दहशत विराटने मालिकेआधीपासून ऑस्ट्रेलियावर निर्माण केली होती. ऑस्ट्रेलियन संघ भारताविरुद्ध नव्हे, तर एकटय़ा विराटविरुद्धच लढणार आहे, असेच काहीसे चित्र निर्माण झाले होते. संपूर्ण मालिकेत विराटच्या धावांचा वेध घेतल्यास ०, १३, १२, १५ आणि ६ अशा त्याच्या सहा डावांमधील धावा होत्या. त्यात भर म्हणून की काय विराटला रांचीच्या सामन्यात दुखापत झाली. विराट धरमशालाच्या चौथ्या कसोटीत खेळणार नाही, याच आनंदात ऑस्ट्रेलियन संघ गाफील राहिला. त्यामुळे कसोटीआधी जेव्हा ऑस्ट्रेलियन संघ दलाई लामांच्या भेटीला गेला, तेव्हा आपण अर्धी लढाई जिंकल्याच्या थाटात स्मिथ म्हणाला की, दलाई लामांच्या आशीर्वादामुळे आता मी शांतपणे झोपू शकेन. खरे तर विराटचा अडसर आता नसेल, त्यामुळे मला शांतपणे झोप लागेल, असे त्याला म्हणायचे होते.

दुसऱ्या बाजूने या लढतीचा विचार केल्यास स्मिथ प्रत्येक सामन्यात खंबीरपणे खेळपट्टीवर उभा राहिला. मालिकेत त्याच्या खात्यावर एकूण ४९९ धावा जमा होत्या. फिरकीला धार्जिण्या भारतीय खेळपट्टय़ांवर स्मिथने ऑस्ट्रेलियाच्या अन्य फलंदाजांना कसे चिवटपणे उभे राहायचे, याची शिकवण दिली. मॅट रेनशॉ आणि पीटर हँड्सकोम्ब हेसुद्धा भारतीय मैदानांवर पटाईतपणे तासन्तास किल्ला लढवू लागले. दुबईच्या आयसीसी क्रिकेट अकादमीतील सरावाचा पुरेसा फायदा या संघाला झाला. रांचीत अनपेक्षितपणे कसोटी वाचवण्यात ऑस्ट्रेलियाचा संघ यशस्वी झाला होता. मात्र शेवटच्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेने शांतपणे नेतृत्व करीत भारताला सामन्यासह मालिका जिंकून दिली. कारण बाकीच्या खेळाडूंविरुद्धची रणनीतीच त्यांच्याकडे नव्हती. या विजयानिशी भारतीय संघाने आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानावर आपली मोहोर उमटवली.

खराब खेळपट्ट्या

पुण्यात प्रथमच कसोटी सामना झाला, मात्र भारताने रचलेल्या चक्रव्यूहात भारतच फसला. फिरकीचे अस्त्र ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी प्रभावीपणे वापरत मालिकेत आघाडी मिळवली. त्यानंतर बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरील कसोटी जिंकत भारताने मालिकेत १-१ अशी वापसी केली. परंतु दोन्ही खेळपट्टय़ांबाबत खराब खेळपट्टीचा शिक्का आयसीसीच्या अहवालात नोंदला गेला. ऑस्ट्रेलियाच्या आजी-माजी खेळाडूंनी हीसुद्धा संधी सोडली नाही.

एकच लक्ष्य… विराट

एकंदर १६ सदस्यांचा संघ, सोबतीला मार्गदर्शकांचा चमू एवढय़ापुरता ऑस्ट्रेलियाचा संघ या वेळी मर्यादित नव्हता. या वेळी त्यांच्यासोबत तेथील काही माजी क्रिकेटपटू आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीसुद्धा होते. या सर्वाना फक्त विराटला लक्ष्यस्थानी ठेवून अस्त्र टाकण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले होते. त्यामुळे विराट हा डोनाल्ड ट्रम्प आहे, तो सर्पाचा सम्राट आहे, तो दर्जाहीन खेळाडू आहे, असे अनेक ठपके ठेवत त्याची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू एड कोवानने विराटला काही वर्षांपूर्वी स्टम्पने भोसकावेसे वाटले होते, असे आवर्जून नमूद केले. तर विराटने आता विश्रांती घ्यायला हवी, असा सल्ला एका क्रिकेटपटूने दिला. विराटच्या दुखापतीचीही खिल्ली उडवण्याची संधी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी सोडली नाही. विराट हा खांद्याच्या दुखापतीमुळे शेवटच्या सामन्याला मुकला, या घटनेबद्दल गुजरात लायन्सचे प्रशिक्षकपद भूषवणाऱ्या ब्रॅड हॉगने त्याला आयपीएलसाठी स्वत:ला सुरक्षित ठेवायचे असेल, अशी टिप्पणी केली. मात्र भारतातून दडपण वाढू लागल्यानंतर मला असे बोलायचे नव्हते, असे सांगत दिलगिरी प्रकट केली. विराटला सॉरी या शब्दाचे स्पेलिंगसुद्धा ठाऊक नसावे, असे भाष्य क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलँड यांनी केले होते. विराटने मालिका संपल्यानंतर क्रिकेटमध्ये आता ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंशी यापुढे मैत्री करणार नसल्याची सिंहगर्जना केली. मात्र त्याचे वादळ उठल्यानंतर माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात झाला, अशी बतावणी करून मोकळा झाला.

वादग्रस्त स्मिथ

विराटसाठी ऑस्ट्रेलियन पथक एकीकडे कुभांड रचत होते, तसे इथे कुणाला स्मिथसाठी रचावे लागले नाही. तो आपल्या वृत्तीमुळे स्वत:च काही वादांमध्ये अडकला. बेंगळुरू कसोटीत डीआरएस घेताना ड्रेसिंग रूमकडून मदत घेण्याचा ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथचा निर्णय अंगलट आला. नेमक्या त्याच घटनेप्रसंगी स्मिथ-कोहली वादसुद्धा झाला. या घटनेचे तीव्र पडसाद क्रिकेटविश्वात उमटले. स्मिथ अडचणीत सापडला असताना पीटर हँड्सकॉम्ब त्याच्या मदतीला धावून आला. ‘‘मला तू बाद आहेस का, हे नीट सांगता येणार नाही. आपण ड्रेसिंग रूमची मदत घेऊ या,’’ असा सल्ला मीच स्मिथला दिल्याचे हँड्सकॉम्बने सांगितले. अगदी स्मिथनेही दिवसातील खेळानंतरच्या पत्रकार परिषदेत ‘‘त्या वेळी माझा मेंदू निष्क्रिय झाला होता,’’ अशा शब्दांत प्रामाणिकपणाचा आव आणत चूक कबूल केली. विराटने ही संधी गमावली नाही आणि ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू डीआरएस घेताना वारंवार ड्रेसिंग रूमकडे पाहतात, असा आरोप केला. त्यानंतर बीसीसीआयनेही या वादात उडी घेत स्मिथविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. मग दोन्ही क्रिकेट मंडळांनी खेळाच्या भल्याचा दाखला देत समेट घडवला. धरमशाला कसोटी सामन्यात मुरली विजय बाद झाल्यानंतर त्याच्याविषयी उद्गारलेली शिवी टीव्ही चॅनेलने योग्य रीतीने टीपली होती. समाजमाध्यमांवर त्याचे तीव्रतेने पडसाद उमटले.

भारतीय यशातील महत्त्वाचे पैलू

* लोकेश राहुलचे सातत्य : सातत्याचा अभाव हे लोकेश राहुलविषयी ऑस्ट्रेलियाच्या मालिकेआधीपर्यंत म्हटले जायचे. मात्र या वेळी ते त्याने खोटे ठरवले. चार कसोटी सामन्यांत ३९३ धावा काढताना राहुलने सलामीच्या स्थानासाठी आपली कडवी दावेदारी पेश केली. धरमशालाच्या खेळपट्टीवर दुसऱ्या डावात एका बाजूने जिद्दीने किल्ला लढवत भारताच्या विजयाचा अध्याय त्याने रचला.

* उमेश यादवची भेदकता : उमेश यादवने संपूर्ण मालिकेत टिच्चून गोलंदाजी केली आणि आपली भेदकता दाखवून दिली. त्याने चार कसोटी सामन्यांत १७ बळी मिळवत आपल्या गोलंदाजीची चुणूक दाखवली. त्याच्या उसळी मारणाऱ्या चेंडूंनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर अंकुश ठेवला.

* जडेजाचे अष्टपैलुत्व : काही वर्षांपूर्वी रविचंद्रन अश्विनचा साहाय्यक गोलंदाज ही रवींद्र जडेजाची ओळख होती. मात्र आता एक अष्टपैलू खेळाडू अशी स्वत:ची रुबाबदार ओळख तो जपतो. अश्विन अपेक्षित प्रभाव दाखवण्यात अपयशी ठरत असताना जडेजाने मात्र आपल्या डावखुऱ्या फिरकीने कमाल केली. याचप्रमाणे गरजेनुसार भारताचा डाव सावरणारी फलंदाजीसुद्धा केली. कठीण प्रसंगात त्याने केलेल्या भागीदारी भारतासाठी महत्त्वाच्या ठरल्या. कसोटी क्रमवारीतील अव्वल गोलंदाज हे नाव त्याने सार्थ ठरवताना मालिकावीर किताबालाही गवसणी घातली.

* रहाणेचे संयमी नेतृत्व : दुखापतीमुळे विराट अखेरच्या सामन्यात खेळू शकला नसताना रहाणेने नेतृत्वाची भूमिका चोख बजावली. गोलंदाजांमधील बदल योग्यतेने केले. रहाणेने भारताला ही निर्णायक कसोटी जिंकून दिली. त्यानंतर कोहलीपेक्षा रहाणे किती बरा आहे, कसा शांतपणे वावरतो, याचे  उमाळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना आले. म्हणजे, फोडा आणि राज्य करा, हीच नीती ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी दाखवली.

* कुलदीप गवसला : अखेरच्या सामन्यात भारताने पाच गोलंदाजांची रणनीती आखली. त्यामुळे चायनामन कुलदीप यादवला संघात स्थान मिळाले. कुलदीपने त्या संधीचे सोने करताना पहिल्या डावात आपली छाप पाडली.
प्रशांत केणी – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा