ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वाच्या मालिकेपूर्वी हरवलेला फॉर्म बदलण्याची सुवर्णसंधी सलामीवीर वीरेंद्र सेहवागसाठी चालून आली होती. पण इराणी सामन्यात पोटदुखीमुळे माघार घ्यावी लागल्याने त्याच्या भवितव्याची चिंता आणखी बळावली आहे. वर्षभरात भारताला चांगली सलामी देता आली नसल्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर निवड समिती वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या सलामीच्या जोडीचा गांभीर्याने विचार करीत आहे. त्यामुळे ही पोटदुखी सेहवागसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.
गेल्या वर्षांत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत सेहवाग पूर्णपणे निष्प्रभ ठरला होता. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने वर्षभरातले एकमेव शतक झळकावले खरे, पण त्यानंतर पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’च्या सुरावर त्याची फलंदाजी पुन्हा धावांसाठी झगडायला लागली. २०१२मध्ये वर्षभरात नऊ सामन्यांतील १६ डावांमध्ये त्याला ५०५ धावा करता आल्या, तर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या पाच डावांमध्ये ३०, ९, २३, ४० आणि ० या वीरूच्या धावा पाहता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला संधी का द्यावी, हा प्रश्न नक्कीच निवड समितीला पडू शकतो.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी सलामीवीर शोधण्यासाठी निवड समितीने पर्यायांची शोधाशोध सुरू केली आहे. इराणी करंडकात पहिल्या दिवशी शतक झळकावणारा मुरली विजय आणि अर्धशतकी खेळी उभारणारा शिखर धवनसुद्धा सज्ज झाले आहेत. त्याचबरोबर अध्यक्षीय संघाचे कर्णधारपद अभिनव मुकुंद आणि भारत ‘अ’ संघाचे कर्णधारपद शिखर धवनला देत निवड समितीने या सलामीवीरांवर विश्वास व्यक्त केला आहे. मुरलीसारखीच मुकुंद आणि धवन यांनी संधी साधली तर सेहवागचे संघातील स्थान धोक्यात येऊ शकते.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी सेहवागसाठी ही एकमेव संधी होती आणि त्याने ती गमावली, यापुढे त्याच्या हातात काहीच नसेल. निवड समितीने काही धक्कादायक निर्णय यापूर्वीही घेतलेले आहेत, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी निवड समितीने सलामीवीराचा पर्याय निवडण्याचा निर्णय घेतला, तर त्याचा पहिला फटका सेहवागला नक्कीच बसू शकतो.
सेहवागची २०१२मधील
कसोटीतील कामगिरी
बोर्डर -गावसकर चषक (ऑस्ट्रेलिया)
सामने     डाव      धावा      सरासरी
४         ८         १९८      २४.७५
न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका
सामने     डाव      धावा      सरासरी
२         ३         १२८      ४२.६६
इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका
सामने     डाव      धावा      सरासरी
४         ७         २५३      ३६.१४