लाचखोरीच्या प्रकरणी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) कार्यालयावर गुरुवारी सीबीआयने छापेमारी केली. यावेळी साईच्या संचालकांसहीत चार जणांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले. यामध्ये दोन ‘साई’मधील कर्मचारी तर अन्य दोघांचा समावेश आहे. दिल्लीच्या लोदी रोड भागातील क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये छापे टाकून अटकेची कारवाई करण्यात आली.

याबाबत बोलताना केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड म्हणाले की आमचे सरकार हे भ्रष्टचारमुक्त कारभारासाठी कटिबद्ध आहे. आम्हाला ज्या वेळी अधिकाऱ्यांच्या लाचखोरीबाबत तक्रारी आल्या, तेव्हा आम्हीच संबंधित अधिकाऱ्यांची माहिती सीबीआयला दिली. आणि त्याच आधारावर सीबीआयने छापे मारले. आम्ही भ्रष्टाचारी आणि लाचखोर अधिकारी यांची अजिबात गय केली जाणार नाही, असे त्यांनी ट्विट करत स्पष्ट केले.

‘साई’मधील सुत्रांच्या माहितीनुसार, सीबीआयचे अधिकारी संध्याकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास जवाहरलाल नेहरु स्टेडिअम येथील साईच्या मुख्यालयात पोहोचले. सीबीआयने कर्मचाऱ्यांचा शोध आणि चौकशीसाठी संपूर्ण परिसर सील करु ठेवला होता. दोन महिन्यांपूर्वी या कार्यालयातील कोणीतरी लाच घेतल्याची तक्रार केली होती. सीबीआयने याच लाचखोरीच्या प्रकरणात ‘साई’च्या कार्यालयावर छापेमारी केली.

‘साई’चे महासंचालक नीलम कपूर यांनी आधीच स्पष्ट केले होते की ‘साई’मध्ये भ्रष्टाचाराला कोणतीही जागा नाही. त्यामुळे या प्रकरणी करण्यात आलेल्या कोणत्याही कारवाईला आपला पाठींबाच असेल.