अमेरिकेत नुकत्याच झालेल्या जागतिक स्पर्धेत ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवून सैकोम मीराबाई चानू या खेळाडूने वेटलिफ्टिंगच्या क्षेत्रात भारताची मान उंचावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय वेटलिफ्टिंग क्षेत्राची ‘उत्तेजकाने ग्रासलेले क्षेत्र’ अशीच काहीशी ओळख झाली होती. भारतीय खेळाडूंच्या कामगिरीपेक्षाही उत्तेजकामुळे कारवाईत सापडलेल्यांबाबत अधिक चर्चा होत असते. मात्र या चर्चेस छेद देत सैकोम मीराबाई चानू या मणिपूरच्या खेळाडूने जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. तिच्या या यशामुळे भारतीय वेटलिफ्टिंग क्षेत्रात पुन्हा चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे व भारतीय खेळांडूंकडे निष्कलंक यश मिळविण्याची क्षमता आहे हेही सिद्ध झाले आहे.

मीरा हिने अमेरिकेत झालेल्या जागतिक स्पर्धेत ४८ किलो वजनी गटात हे यश मिळविताना राष्ट्रीय उच्चांकही प्रस्थापित केला. जागतिक स्पर्धेत २२ वर्षांनी भारताला सुवर्णभरारी घेता आली. यापूर्वी करनाम मल्लेश्वरी हिने १९९४ व १९९५ मध्ये जागतिक स्पर्धेत सोनेरी कामगिरी केली होती. त्यानंतर हे यश मिळविण्याची कामगिरी मीराने केली आहे. मल्लेश्वरी हिने भारतास वेटलिफ्टिंगमधील पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले आहे. तिने २००० मध्ये सिडने येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवीत ऑलिम्पिक पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मानही पटकाविला होता. मीराने जागतिक सुवर्णपदक कामगिरीमुळे करनामसारखे यश मिळविण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे.

भारतीय वेटलिफ्टिंग क्षेत्राने अनेक वेळा उत्तेजकाच्या दुर्दैवी घटना पाहिल्या आहेत. प्रतिमाकुमारी, सानामाचा चानू या महिला खेळाडूंसह भारताचे अनेक खेळाडू उत्तेजकाच्या तडाख्यात सापडले आहेत. नवी दिल्ली येथे २०१० मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या वेळी उत्तेजकाच्या कारवाईमुळे घरच्या स्पर्धेतच भारतीय वेटलिफ्टर्सवर बंदी आली होती. भरमसाठ आर्थिक दंड भरल्यानंतर भारतीय वेटलिफ्टिंग महासंघावरील बंदीची कारवाई मागे घेण्यात आली व भारतीय खेळाडूंना राष्ट्रकुल स्पर्धेत प्रवेश मिळाला. ही पाश्र्वभूमी लक्षात घेतली तर भारतीय वेटलिफ्टिंग क्षेत्रावर सतत टांगती तलवार असते असे म्हटले तर ते फारसे वावगे ठरणार नाही. वेटलिफ्टिंगमध्ये ताकद तसंच ऊर्जेला अधिक महत्त्व असते. केवळ भारतीय खेळाडू नव्हे तर अनेक नामवंत देशांच्या ऑलिम्पिकपटूंवरही उत्तेजकाची कारवाई झाली आहे.

मीरा हिने या पाश्र्वभूमीवर मिळविलेले यश हे खूपच कौतुकास्पद आहे. रिओ येथे गतवर्षी झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भाग घेण्याची तिला संधी मिळाली होती. मात्र त्या वेळी तीनही प्रयत्नांत तिला सपशेल अपयश आले होते. तीनही प्रयत्नांच्या वेळी तिला पूर्णपणे वजन उचलता आले नव्हते. साहजिकच तिच्यावर मानहानीकारक टीका झाली होती. तिला ती टीका खूपच जिव्हारी लागली. हे अपयश जागतिक सुवर्णपदकाद्वारेच धुवून काढावयाचे असा निश्चय तिने केला. सव्वा वर्ष तिने सतत मेहनत केली. मणीपूरचीच ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती एम. सी. मेरी कोम हिचाही आदर्श मीराच्या डोळ्यांसमोर आहे. अनेक वेळा तिला मेरी कोम व मल्लेश्वरी यांच्याकडून बहुमोल मार्गदर्शन मिळाले आहे.

मीराला आईवडिलांकडून भरपूर सहकार्य मिळाले आहे. जागतिक स्तरावर सर्वोच्च यश मिळविण्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. मेरी कोमने ऑलिम्पिक पदक मिळविण्यासाठी घरापासून हजारो मैल दूर असलेल्या पुणे शहरात सराव करण्यास प्राधान्य दिले होते. त्याप्रमाणे मीराने जागतिक स्पर्धेसाठी अनेक गोष्टींचा त्याग केला. ही स्पर्धा झाली, त्या वेळी तिच्या बहिणीचा विवाह होता. घरचा विवाह समारंभ टाळून परदेशात स्पर्धेसाठी जाणे हे खरे तर तिच्या आईवडिलांना पसंत नव्हते. मात्र मीराचा निर्धार पक्का होता. जागतिक स्पर्धेत पदक मिळविण्याबाबत तिला आत्मविश्वास होता. आपण बहिणीला जागतिक सुवर्णपदकाची भेट देणार आहोत असे तिने पालकांना सांगितले. मीराच्या पालकांनाही या वेळी ती ऑलिम्पिकमधील अपयश धुवून काढणार अशी खात्री होती. त्यांनी मन घट्ट करीत तिला स्पर्धेसाठी परवानगी दिली. जागतिक स्पर्धेसाठी व स्पर्धा सुरू असताना अनेक वेळा मीराला घरच्या आठवणी येत होत्या. मात्र आता मागे हटायचे नाही, आपल्याला सुवर्णमोहोर जिंकायची आहे अशी खूणगाठ तिने मनाशी बांधली होती. त्यामुळेच तिला हे सर्वोत्तम यश मिळविता आले.

मीराच्या यशामध्ये तिचे प्रशिक्षक विवेक शर्मा यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने खूप चांगली प्रगती केली. ४८ किलो गटात साधारणपणे कोणत्या खेळाडूंचे आव्हान आहे, त्यांची कामगिरी कशी आहे, आपल्याला कोणत्या वजनांपर्यंत झेप घ्यावयाची आहे आदी गोष्टींचा तिने शर्माच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला. त्यासाठी पूरक व्यायाम, प्राणायाम, योगा, जिम आदी गोष्टींबाबतही तिला मार्गदर्शन मिळाले. भारतीय खेळाडूंना जागतिक वेटलिफ्टिंगमध्ये परदेशी मार्गदर्शक नसतानाही सर्वोच्च यश मिळविता येते हे शर्मा यांनी दाखवून दिले आहे. भारतीय वेटलिफ्र्टसना यापूर्वी परदेशी प्रशिक्षकांबरोबर फारसा सुसंवाद साधता आलेला नाही. किंबहुना परदेशी प्रशिक्षकांमुळेच मध्यंतरी काही महिला वेटलिफ्टर्सवर उत्तेजकाची कारवाई झाली होती. शर्मा यांनी उत्तेजकाबाबत खूप अभ्यासही केला आहे. आपले खेळाडू त्यामध्ये सापडणार नाहीत याची काळजी ते घेत असतात.

मीरा रेल्वेत नोकरीस असल्यामुळे तिला तेथेही चांगल्या सवलती व सुविधा मिळत असतात. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने ऑलिम्पिकपटूंकरिता विशेष प्रशिक्षण साहाय्य योजना सुरू केली आहे. त्यातही मीराचा समावेश आहे. पुढच्या वर्षी राष्ट्रकुल क्रीडा व आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये सर्वोच्च कामगिरी करण्यासाठी मीरा उत्सुक आहे. २०२० मध्ये टोकियो येथे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा होणार आहे. त्या स्पर्धेसाठी मीरा आतापासूनच तयारी करीत आहे. रिओ येथील अपयशाच्या कटू आठवणी तिच्या मनातून जात नाहीत. टोकियो येथील ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवीतच हे यश धुवून काढण्याचे तिचे ध्येय आहे. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्यासाठी केलेला त्याग लक्षात घेता ती टोकियोत  ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न साकार करील अशी आशा आहे.

मीरा हिच्यासारख्या अनेक खेळाडू पूर्वाचल प्रदेशात आहेत. त्यांना गरज आहे ती चांगल्या मार्गदर्शनाची व आर्थिक साहाय्याची. देशाचे पंतप्रधानपद नरेंद्र मोदी यांच्याकडे आल्यानंतर देशातील क्रीडा क्षेत्रात अच्छे दिन सुरू झाले आहेत. त्यातही केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा कारभार ऑलिम्पिक रौप्यपदक विजेते राजवर्धनसिंह राठोड यांच्याकडे आल्यानंतर क्रीडा क्षेत्रात सकारात्मक वातावरण तयार होऊ लागले आहे. या वातावरणाचा फायदा घेत खेळाडूंनीही सर्वोच्च यश कसे मिळविता येईल याचा विचार केला पाहिजे व त्यानुसार सरावावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. तसे झाले तर अनेक ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू आपल्या देशात तयार होतील.
मिलिंद ढमढेरे – response.lokprabha@expressindia.com
(सौजन्य – लोकप्रभा)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weightlifter saikhom mirabai chanu
First published on: 08-12-2017 at 01:02 IST