क्रीडा पत्रकार म्हटला की त्याचा दृष्टिकोन हा प्रत्येक खेळाप्रती सारखाच असला पाहिजे.. याचे उत्तम उदाहरण म्हणजे माजी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार दिवंगत चंद्रशेखर संत. क्रिकेट असो किंवा ज्युदो किंवा कराटे. संत यांचे प्रत्येक खेळावर प्रेम; म्हणूनच प्रत्येक खेळाच्या संघटनांमध्ये ते बहुपरिचित होते. आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांनी अशी अनेक माणसे जोडली अन् विविध खेळाचा प्रचार, प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.. अशा अनेक आठवणींना मंगळवारी उजाळा मिळाला. निमित्त होते, संत यांच्या शोकसभेचे. या शोकसभेत विविध माध्यमातील पत्रकारांनी संत यांच्या आठवणी ताज्या केल्या. त्यामुळे ही शोकसभा म्हणजे ‘आठवणींचा जागर’ ठरला. संत यांचे १३ नोव्हेंबरला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ज्येष्ठ क्रीडा पत्रकार जी. विश्वनाथ यांनी संत यांचा १९८३च्या विश्वचषकादरम्यानचा किस्सा सांगताना संत यांनी घराघरात कसे स्थान मिळवले होते, याचा प्रत्यय आला.