West Indies Cricketer Accused of Sexual Assualt: सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. जिथे संघ कसोटी आणि टी-२० मालिका खेळणार आहे. तर पहिला कसोटी सामना २५ जूनपासून सुरू झाला असून वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. दरम्यान वेस्ट इंडिजच्या सिनियर संघाचा भाग असणाऱ्या एका खेळाडूवर लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
सध्या वरिष्ठ राष्ट्रीय संघाचा भाग असलेल्या वेस्ट इंडिजच्या एका क्रिकेटपटूवर लैंगिक छळ आणि बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. कॅरिबियनमधील एका मीडिया रिपोर्टनुसार, अल्पवयीन मुलीसह अकरा महिलांनी एका क्रिकेटपटूवर बलात्काराचा तसंच लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे.
कायतेर न्यूजच्या वृत्तानुसार, ज्या क्रिकेटपटूवर हे आरोप करण्यात आले आहेत, तो गयानाचा आहे. अनेक महिलांनी गयानामधील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, अहवालात असा दावा केला आहे की हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. अलिकडेच गयाना पोलिस दलाला एका घटनेची तक्रार करणाऱ्या महिलेला तक्रार नोंदवताना प्रश्नोत्तरादरम्यान तिला भावनिक त्रास दिला आणि त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्थानिक माध्यमांनुसार, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
१८ वर्षांच्या एका महिलेच्या कुटुंबाने आरोप केला आहे की, क्रिकेटपटूने ३ मार्च २०२३ रोजी बर्बिसमधील न्यू अॅमस्टरडॅम येथील एका ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्या मुलीला आरोप केलेल्या क्रिकेटपटूचा मित्र तिच्या कामावरून त्या ठिकाणी भेटण्यासाठी घेऊन गेला होता, जो तिच्या कुटुंबाच्या परिचयाचा आहे.
ती मुलगी त्या घराजवळ जात असताना तिला अनेक जण तिथे दिसले त्यामुळे तिला सुरुवातीला सुरक्षित वाटलं. पण आत गेल्यानंतर क्रिकेटपटूने तिला वरच्या मजल्यावर नेलं, जिथे हा संपूर्ण प्रसंग घडला. कुटुंबाचा असा दावा आहे की पोलिसांकडून हे प्रकरण लपवण्याचा सतत प्रयत्न केला जात आहे. पीडितेच्या आईने सांगितले की तिच्या मुलीचा आरोपीवर विश्वास होता आणि आता या प्रसंगानंतर ती प्रचंड घाबरली आहे.