आयपीएल २०२१ स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून चेन्नई, दिल्ली आणि बंगळुरू संघाने प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. दुसरीकडे चौथ्या स्थानासाठी कोलकाता, राजस्थान, मुंबई आणि पंजाबमध्ये चुरस आहे. तर गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवण्यासाठी दिल्ली आणि चेन्नई यांच्यात लढत होत आहे. दोन्ही संघाचे गुणतालिकेत प्रत्येकी १८ गुण आहेत. चांगल्या धावगतीमुळे चेन्नईचा संघ सध्यातरी अव्वल स्थानी आहे. मात्र एकीकडे आयपीएलची रंगत वाढत असताना महेंद्रसिंह धोनीबाबत दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने भविष्यवाणी केली आहे.

“धोनी चेन्नईचा बॉस आहे. जेव्हा चेन्नई संघाची चर्चा होते, तेव्हा धोनीबाबत विचार करता. तुम्हाला माहिती आहे, आता आयपीएल संपण्यासाठी काही दिवस उरले आहेत. धोनीचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला असून काही सामने बाकी आहेत. असं असताना धोनीने या स्पर्धेत छाप उमटेल अशी कामगिरी केलेली नाही. जर अंतिम सामन्यात विजयी धावा केल्यास खात्रीशीर सांगतो की, पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघात खेळताना दिसेल.”, असं डेल स्टेनने इएसपीएनक्रिकइन्फोशी चर्चा करताना सांगितलं.

युवराज सिंगकडून भारताच्या ‘भावी’ कर्णधाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाला…!

आयपीएलमध्ये पुढच्या वर्षी दोन नव्या संघांचा समावेश होणार आहे. त्यामुळे आयपीएल २०२२ पूर्वी मोठी लिलाव प्रक्रिया पार पडेल. त्याचबरोबर काही संघात बदल पाहायला मिळतील. महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तर आयपीएलमध्ये चेन्नईचं नेतृत्व करत आहे. वाढतं वय आणि खराब कामगिरीमुळे त्याच्यावर आयपीएल सोडण्याचा दबावही वाढत आहे. त्यामुळे महेंद्रसिंह धोनी पुढच्या वर्षी खेळणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह आहे.