Bowl Out: इंग्लंडमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स या स्पर्धेला १८ जुलैपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेची सुरूवात पाकिस्तान चॅम्पियन्स आणि इंग्लंड चॅम्पियन्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्याने झाली. तर स्पर्धेतील दुसरा सामना दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स आणि वेस्ट इंडिज चॅम्पियन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना बरोबरीत राहिला. त्यामुळे सामन्याचा निकाल हा बॉल आऊटने लावण्यात आला. टी-२० क्रिकेटमध्ये सामना बरोबरीत राहिल्यानंतर, सुपर ओव्हर खेळवली जाते. मग बॉल आऊट म्हणजे नेमकं काय? नियम काय असतात? जाणून घ्या.
बॉल आऊटने सामन्याचा निकाल लावण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही टी-२० क्रिकेटमध्ये बॉल आऊटने सामन्याचा निकाल लावला गेला आहे. सर्वात आधी न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या सामन्यात बॉल आऊटचा वापर केला गेला होता. त्यानंतर २००७ मध्ये झालेला भारत- पाकिस्तान सामना देखील बरोबरीत राहिला होता. या सामन्याचा निकाल देखील बॉल आऊटने लागला होता.
काय असतो बॉल आऊटचा नियम?
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप कमी वेळेस बॉल आऊट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सामना बरोबरीत राहिल्यानंतर बॉल आऊटचा वापर केला जायचा. नियम सोपा आहे. दोन्ही संघातील ५-५ गोलंदाजांना प्रत्येकी १-१ चेंडू टाकण्याची संधी मिळते. समोर फलंदाज नसतो, फक्त यष्टीमागे यष्टीरक्षक असतो. गोलंदाजाने आपली गोलंदाजी अॅक्शन पूर्ण करून यष्टी उडवायची असते. जो संघ ५ पैकी सर्वात जास्त वेळेस यष्टी उडवेल, तो संघ विजयी ठरतो. जर दोन्ही संघातील गोलंदाजांनी ५-५ वेळेस यष्टीवर अचूक निशाणा लावला, तर पुन्हा एकदा ५-५ वेळेस यष्टी उडवण्याची संधी दिली जाते.
आयसीसी टी-२० वर्ल्डकप २००७ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. हा सामना बरोबरीत राहिला होता. त्यावेळी सामन्याचा निकाल हा बॉल आऊटने लावला गेला होता. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी बाजी मारून भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर सुपर ओव्हरने सामन्याचा निकाल लावला जाऊ लागला.