IND-W vs SA-W Women’s World Cup Final 2025: भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघांमध्ये वनडे विश्वचषक २०२५ मधील अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. चांगली सुरूवात केल्यानंतर भारतीय संघ अपेक्षित धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. यासह महिला विश्वचषक फायनलमधील सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग करण्यात आलेली धावसंख्या किती आहे, जाणून घेऊया.
नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये होत असलेला फायनल सामना पावसामुळे २ तास उशिराने सुरू झाला. त्यानंतर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत ७ बाद २९८ धावा केल्या आहेत. यासह दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये विजयासाठी २९९ धावांचं आव्हान दिलं आहे.
भारताकडून सलामीवीर शफाली वर्मा व स्मृती मानधना यांनी १०४ धावांची भागीदारी रचत संघाला कमालीची सुरूवात करून दिली. पण नंतर दक्षिण आफ्रिकेने पुनरागमन करत भारताच्या धावांना ब्रेक लावला आणि लागोपाठ विकेट्स पटकावले. यामुळे भारतीय संघ ३०० पार धावसंख्या गाठू शकला नाही. आफ्रिकेकडून आयागोंका खाकाने ३ विकेट्स घेतल्या, तर गोलंदाजांनी तिला चांगली साथ दिली.
महिला एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यात सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग
२००९ च्या महिला एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंडने सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला. प्रथम फलंदाजी करताना, किवी संघ ४७.२ षटकांत १६६ धावांवर बाद झाला. प्रत्युत्तरादाखल, इंग्लंडने ४६.१ षटकांत ६ बाद १६७ धावा केल्या आणि महिला एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम केला. या अंतिम सामन्यात विजय मिळवून इंग्लंड तिसऱ्यांदा विश्वविजेता बनला, तर इंग्लंडच्या महिला संघाने आतापर्यंत चार वेळा विजेतेपद जिंकले आहे.
महिला एकदिवसीय विश्वचषकातील सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग झालेली धावसंख्या पाहता दक्षिण आफ्रिकेला जर जिंकायचं असेल तर रेकॉर्डब्रेकिंग कामगिरी करावी लागणार आहे, कारण महिला वनडे विश्वचषकात आजवर कधीच २०० अधिक धावांचं लक्ष्य पार झालेलं नाही.
महिला एकदिवसीय विश्वचषकातील सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग करणारे संघ
१६७ धावा – इंग्लंड वि. न्यूझीलंड – इंग्लंड विजयी – २००९, सिडनी
१६५ धावा – ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड – ऑस्ट्रेलिया विजयी – १९९७, कोलकाता
१५२ धावा – ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड – १९८२, क्राईस्टचर्च
१२८ धावा – ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड – १९८८, मेलबर्न
