भारताचा अंडर-१९ संघही सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड अंडर-१९ संघाविरूद्ध वनडे मालिकेत विजय मिळवल्यानंतर आता दोन्ही संघांमध्ये युथ टेस्ट मॅच खेळवला जात आहे. दरम्यान इंग्लिश संघ भारतीय वंशाच्या अनेक खेळाडूंना प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देत आहे. यामध्ये अष्टपैलू खेळाडू एकांश सिंगचे नाव आहे. दुसऱ्या युथ टेस्ट मॅचमध्ये एकांशने शतक झळकावत एकहाती इंग्लंड संघाचा डाव सावरला आहे. पण हा एकाश सिंह नेमका आहे कोण, जाणून घेऊया.
भारताविरूद्ध दुसऱ्या युथ टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडच्या एकांश सिंगने शतकी खेळी केली. एकांशने भारतीय गोलंदाजीविरूद्ध कमालीची फटकेबाजी करत संघाचा डाव सावरला. पहिल्या दिवसाच्या अखेरीस, ७व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला एकांश ९८ चेंडूत ६६ धावा करून नाबाद राहिला. एकांशच्या या दमदार फलंदाजीमुळे इंग्लंडचा संघ पहिल्या दिवशी ७ गडी गमावून २२९ धावांपर्यंत पोहोचू शकला. तर एकांशच्या शतकी खेळीच्या जोरावर संघ ३०९ धावा करत सर्वबाद झाला.
भारताविरूद्ध शतक करणारा एकांश सिंह आहे तरी कोण?
इंग्लंडच्या अंडर-१९ संघाचा भाग असलेला एकांश सिंग हा भारतीय वंशाचा आहे. त्याचा जन्म १६ जुलै २००६ रोजी लंडनमधील ऑर्फिंग्टन येथे झाला. तो केंट काउंटी क्रिकेट क्लबकडून खेळतो. एकांश हा उजव्या हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. यासह तो संघात गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळत आहे.
एकांश सिंगने काउंटी क्रिकेटमध्ये २ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ८४ धावा केल्या आहेत. १९ वर्षीय एकांशने केंटसाठी ५ लिस्ट ए सामने देखील खेळले आहेत. केंट सेकंड इलेव्हनसाठी चांगली कामगिरी केल्यानंतर एकांशने इंग्लंडच्या अंडर-१९ क्रिकेट संघात आपले स्थान निश्चित केले आहे. त्याला भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाविरुद्धच्या युथ वनडे सामन्यात त्याला संधी मिळाली, परंतु त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. पण त्याने एक विकेट आपल्या नावे केली.
एकांश सिंगने दुसऱ्या युथ टेस्ट मॅचमध्ये कमालीची फलंदाजी केली. त्याने पहिल्या डावात ५९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. मात्र, दुसऱ्या डावात तो फक्त १ धाव करू शकला. एकांशला विकेट घेण्यातही यश मिळालं नाही. एकांशला दुसऱ्या युवा कसोटी सामन्याच्या प्लेईंग इलेव्हनमध्येही संधी मिळाली. ज्यामध्ये त्याने पहिल्या डावात १५५ चेंडूंत १४ चौकार आणि ३ षटकारांसह ११७ धावांची खेळी केली. इंग्लंड संघाकडून दुसऱ्या युथ टेस्टमधील पहिल्या डावात शतकी खेळी करणारा तो एकमेव फलंदाज आहे.