Why India Boycotted Asia Cup before 39 Years: आशिया चषक २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज १४ सप्टेंबरला सामना होणार आहे. चाहत्यांच्या कायमचं भारत-पाक सामन्यावर नजरा खिळलेल्या असतात. पण सध्याच्या घडीला मात्र भारत पाकिस्तान सामना होऊ नये, या सामन्यावर भारताने बंदी घालावी, अशी मागणी केली जात आहे. पण बीसीसीआय, भारत सरकारने मात्र भारतीय क्रिकेट संघाला हा सामना खेळण्याची परवानगी दिली आहे. पण १९८६ साली भारताने आशिया चषक खेळण्यावर बंदी घातली होती, तेव्हा नेमकं काय घडलं होतं, जाणून घेऊया.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात २६ जणांना आपला जीव गमवावा लागला होता, याचा निषेध म्हणून भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्याची मागणी केली जात आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्धवस्त केले. तेव्हापासून दोन्ही देशांमधील राजकीय तणाव शिगेला पोहोचला आहे. यानंतर आता आशिया चषकातील सामन्यापूर्वी #BoycottINDvPAK हा ट्रेंड सुूरू आहे.

भारत सरकारने पाकिस्तानविरूद्ध सामना खेळण्यासाठी दिली परवानगी

भारत सरकारने म्हटलं आहे की भारत आणि पाकिस्तान द्विपक्षीय सामन्यांमध्ये एकमेकांशी खेळणार नाहीत. तर बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास कोणतेही बंधन नाही. आता आशिया कप ही एक बहुराष्ट्रीय स्पर्धा आहे. म्हणूनच भारतीय क्रिकेट संघ १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध सामना खेळत आहे.

भारताने १९८६ मध्ये आशिया चषक खेळण्यावर का घातली होती बंदी?

आशिया चषक स्पर्धेला १९८4 मध्ये सुरूवात झाली. पहिला हंगामदेखील युएईमध्ये खेळवण्यात आला होता. तीन संघांमध्ये खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेत सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.

१९८६ मध्ये श्रीलंकामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. गतविजेत्या भारतासमोर आपलं जेतेपद राखण्याचं तगडं आव्हान होतं. परंतु श्रीलंकेतील यादवी युद्धामुळे भारतीय संघ श्रीलंकेत सामने खेळण्यासाठी पोहोचला नाही. भारत सरकारने बीसीसीआयला स्पर्धेच सहभागी न होण्याचे निर्देश दिले. भारताची जागा बांगलादेश या नवीन संघाने घेतली. तोपर्यंत बांगलादेशने एकही एकदिवसीय सामना खेळलेला नव्हता.

१९८६ च्या आशिया चषकाच्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यांनी ३५.३ षटकांत ९५ धावा केल्या. पाकिस्तानने ३२.१ षटकांत हे लक्ष्य गाठत विजय मिळवला होता. श्रीलंकेविरुद्धच्या त्यांच्या पुढच्या सामन्यात, बांगलादेशने १०० धावांचा टप्पा ओलांडला आणि एकूण १३१ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेला ३१.३ षटकांत विजय मिळवत आशिया चषकाच्या दुसऱ्या हंगामाचं जेतेपद पटकावलं.