आयर्लंड वि. वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० मालिका वेस्ट इंडिजने आपल्या नावे केली आहे. अखेरच्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजने २५६ धावांचा मोठा डोंगर उभारला. या सामन्यात आयर्लंडकडून नव्या गोलंदाजाने पदार्पण केले होते. पण हे पदार्पण मात्र नको त्या विक्रमासाठी त्याच्या कायम लक्षात राहणार असेल.

आयर्लंडचा वेगवान गोलंदाज लियाम मॅकार्थीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टी-२० मध्ये पदार्पण केले. पण त्याचं पदार्पण मात्र एका वाईट स्वप्नासारखं ठरलं. त्याने त्याच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये तब्बल ८१ धावा दिल्या. वेगवान गोलंदाज मॅकार्थीने त्याच्या पहिल्याच टी२० सामन्यात खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये नकोसा विक्रम आपल्या नावे केला आहे.

आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर वेस्ट इंडिजच्या डावाच्या पाचव्या षटकात मॅकार्थीकडे गोलंदाजीची करण्याची जबाबदारी दिली. वेस्ट इंडिजचा टी-२० कर्णधार शे होपने त्याच्या पहिल्या दोन चेंडूंवर सलग दोन षटकार लगावले. यानंतर, एविन लुईसने मॅकार्थीच्या पहिल्या षटकात चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर चौकार मारत २१ धावा केल्या.

मॅकार्थी त्याच्या षटकातील दुसरे षटक टाकण्यासाठी परतला, तेव्हा त्याने २४ धावा दिल्या. लुईसने त्याच्या पहिल्या चार चेंडूत एक षटकार आणि सलग तीन चौकार मारले तर होपने शेवटच्या चेंडूवर आणखी एक चौकार खेचला. त्याच्या तिसऱ्या षटकात, शिमरॉन हेटमायरने पहिल्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर चौकार खेचले. केसी कार्टीनेही तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला आणि त्या षटकातून १८ धावा काढल्या.

मॅकार्थीच्या शेवटच्या षटकातही त्याची धुलाई करण्यात आली, कार्टीने एक चौकार आणि दोन षटकार लगावले. यासह मॅकार्थीने चार षटकांत एकही विकेट न घेता ८१ धावा दिल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटच्या इतिहासात ४ षटकांच्या स्पेलमध्ये सर्वाधिक धावा देणारा मॅकार्थी दुसरा गोलंदाज ठरला आहे. गांबियाच्या मुसा जोबार्टेने एका टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात यापेक्षा जास्त धावा दिल्या आहेत. ऑक्टोबर २०२४ मध्ये आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक उपप्रादेशिक आफ्रिका पात्रता गट बी दरम्यान नैरोबी येथे झिम्बाब्वेविरुद्ध चार षटकांत ९३ धावा दिल्या होत्या. या यादीत तिसऱ्या स्थानावर श्रीलंकेचा कसुन रजिथा आहे, ज्याने ऑक्टोबर २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७५ धावा दिल्या होत्या.