टी-२० विश्वचषक स्पर्धेमधून गुरुवारी गतविजेत्या वेस्ट इंडिजला ‘अव्वल-१२’ फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. चरिथ असलंका (४१ चेंडूंत ६८ धावा) आणि पथुम निस्सांका (४१ चेंडूंत ५१) यांच्या अर्धशतकांमुळे श्रीलंकेने गुरुवारी विंडीजवर २० धावांनी मात केली आणि विंडीजच्या संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं.

एकीकडे श्रीलंकेने विजयासहीत या स्पर्धेमधील आपल्या प्रवासाची सांगता केली. तर दुसरीकडे वेस्ट इंडीजच्या संघाचा हा चार सामन्यांमधील तिसरा पराभव ठरला. या पराभवानंतर कर्णधार कायरन पोलार्डने कठोर शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. खास करुन अनुभवी खेळाडूंना पोलार्डने खडे बोल सुनावले आहेत. पोलार्डने सुमार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्वत:चाही समावेश केलाय.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीची निर्णय विंडीजने घेतला. श्रीलंकेने २० षटकांमध्ये तीन गड्यांच्या मोबदल्यात १८९ धावा केल्या. विंडीजच्या संघाने २० षटकांमध्ये आठ गड्यांच्या मोबदल्यात १६९ धावांपर्यंतच मजल मारली. आश्चर्याची बाब म्हणजे शिमरॉन हेटमायर (८१ नाबाद) आणि निकोलस पूरन (४६) हे दोनच जण दुहेरी धावसंख्या करु शकले.

“आम्ही अशा महत्वाच्या सामन्यांमध्ये फार मागे राहिलो. आम्ही चांगले प्रदर्शन केले नाही. फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टी होती मात्र १८९ धवा जरा जास्तच झाल्या. एवढ्या धावा करुन श्रीलंकेने आम्हाला सामन्याच्या बाहेर काढलं. ते या खेळपट्टीवर फार हुशारीने खेळले. त्यांनी १७ चौकार आणि ३ षटकार लगावले. त्यांनी सतत स्ट्राइक रोटेट केली आणि बऱ्याच २-२ धावा जमल्या. त्यांनी आम्हाला कोणतीच संधी दिली नाही. श्रीलंकन संघाला १२० ते १४० दरम्यान रोखण्याचा आमचा विचार होता. मात्र त्यांनी फारच उत्तम फलंदाजी केली,” असं पोलार्ड प्रतिस्पर्धी संघाच्या कामगिरीबद्दल बोलताना म्हणाला.

“आम्ही हुशारी दाखवत फलंदाजी करणं गरजेचं होतं. हेटमायरने केलं ते आम्हा करायला हवं होतं. श्रीलंका काय करु शकते याचा आम्हाला अंदाज होता. आम्ही अधिक चांगली कामगिरी करायला हवी होती. निकोलस पूरनने चांगली फलंदाजी केली. आम्हाला आमच्या फलंदाजीवर काम करुन सुधारणा करण्याची गरज आहे. आमच्याकडे कौशल्य आहे. मात्र आम्हाला चांगली कामगिरी करता येत नाही. आम्हाला हे स्वीकारलं पाहिजे की आमच्या अनुभवी खेळाडूंनी चांगली कामगिरी केली नाही. माझ्यासारख्या अनुभवी खेळाडूचाही यामध्ये समावेश होतो,” असं निराश झालेला पोलार्ड म्हणाला.

“आम्हाला पुढे जाण्याची गरज आहे. काही तरुणांनी त्याच्या कामगिरीच्या माध्यमातून संघाला मदतीसाठी हात पुढे केले आहेत. हे भविष्याच्या दृष्टीने चांगलं आहे. अशा गोष्टी घडत राहतात, मात्र खेळ सुरु ठेवला पाहिजे. ड्रेसिंग रुममध्ये आमचे खेळाडू निराश झाले आहेत. खास करुन फलंदाज फार निराश आहे. मात्र आता निराश होऊन फायदा नाही, या साऱ्यातून धडा घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे,” असं पोलार्ड म्हणालाय.