Wiaan Mulder Missed 400 Runs Record: अशक्य ते शक्य करण्याची नामी संधी वियान मुल्डरने गमावली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणं ही कुठल्याही फलंदाजासाठी मोठी गोष्ट असते. कारण खेळपट्टीवर टिकून राहणं आणि धावा करणं हे मुळीच सोपं नसतं. त्यामुळे फलंदाज आधी शतक मग द्विशतक आणि काही मोजकेच फलंदाज त्रिशतकी खेळीपर्यंत पोहोचताच. कसोटी क्रिकेटमध्ये ४०० धावांचा विचारच करू नका, कारण १५० वर्षांच्या इतिहासात केवळ एका फलंदाजाला कसोटी क्रिकेटमध्ये ४०० धावांचा डोंगर सर करता आला आहे.

हा फलंदाज म्हणजे वेस्टइंडिजचा दिग्गज खेळाडू ब्रायन लारा. हा रेकॉर्ड कोणीच मोडू शकणार नाही, असं म्हटलं जात होतं. मात्र वियान मुल्डरकडे ही संधी चालून आली होती. मुल्डर ३६७ धावांपर्यंत पोहोचला होता. त्याला ४०० धावा करण्याची संधी होती. पण दक्षिण आफ्रिकेने ६२६ धावांवर डाव घोषित केला.

ब्रायन लारा यांनी २००४ मध्ये इंग्लंडविरूद्ध खेळताना ४०० धावांची मॅरेथॉन खेळी केली होती. हा रेकॉर्ड कोणालाही मोडता येईल याची शक्यता खूप कमीच होती. कारण काही फलंदाज ४०० धावांच्या जवळपास पोहोचले, पण ४०० धावांचा पल्ला गाठू शकले नव्हते. मुल्डरकडे हा रेकॉर्ड मोडण्याची संधी होती. पण तो ३६७ धावांवर नाबाद परतला. आणखी काही मिनिटं फलंदाजी केली असती, तर त्याने ४०० धावांचा रेकॉर्ड मोडला असता.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे फलंदाज
ब्रायन लारा- ४०० धावा
मॅथ्यू हेडन – ३८० धावा
ब्रायन लारा- ३७५ धावा
महेला जयवर्धने – ३७४ धावा

वियान मुल्डर- ३६७*
गॅरी सोबर्स- ३६५ धावा

असा रेकॉर्ड करणारा दक्षिणेचा पहिलाच फलंदाज

या मॅरेथॉन खेळीसह वियान मुल्डरने अनेक रेकॉर्ड मोडून काढले आहेत. वियान मुल्डर हा दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वात मोठी वैयक्तिक खेळी करणारा फलंदाज ठरला आहे. याआधी हा रेकॉर्ड हाशिम आम्लाच्या नावावर होता. हाशिम आम्लाने २०१२ मध्ये इंग्लंडविरूद्ध फलंदाजी करताना ३११ धावांची खेळी केली होती. हा रेकॉर्ड गेल्या १३ वर्षांपासून अबाधित होता. आता वियान मुल्डरने हा रेकॉर्ड मोडून काढला आहे. वियान मुल्डरने कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वात मोठी वैयक्तिक खेळी करण्याचा रेकॉर्डही आपल्या नावावर केला.

यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात सर्वात मोठी खेळी करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. याआधी कुठल्याही खेळाडूला कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच सामन्यात ३०० धावांचा पल्ला गाठता आलेला नाही. हा रेकॉर्ड मोडून काढणं कठीण नाही, तर अशक्य असणार आहे.

वियान मुल्डर हा दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू आहे. वियान मुल्डरने वेगवान गोलंदाज म्हणून संघात स्थान मिळवलं. म्हणून आठव्या क्रमांकाला फलंदाजीला येणारा गोलंदाज अशी त्याची ओळख. पण, त्याचं फलंदाजीतील कौशल्य पाहून त्याला ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं. पहिल्या सामन्यात त्याने ४४ चेंडू खेळून काढले आणि ६ धावा केल्या. मात्र, दुसऱ्या डावात त्याने केलेली खेळी अतिशय महत्वाची ठरली.

दुसऱ्या डावात फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर स्वस्तात माघारी परतला होता. त्यानंतर मुल्डर फलंदाजीला आला आणि ५० चेंडूंचा सामना करत त्याने २७ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने एडेन मारक्रमसोबत मिळून महत्वाची भागीदारी केली. यासह गोलंदाजी करताना त्याने १ गडी बाद केला. झिम्बाब्वेविरूद्ध झालेल्या पहिल्या कसोटीत त्याने १४७ धावांची खेळी केली. तर गोलंदाजी करताना त्याने ४ गडी बाद केले. आता दुसऱ्या कसोटीत आणखी एक विक्रमी खेळी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.