इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेचा ‘ड्रॉ’ कठीण आहे. मात्र तरीही मी जेतेपदासाठी सर्वोत्तम प्रयत्न करेन, असे उद्गार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने काढले. इंडिया ओपन स्पर्धा नवी दिल्लीत २३ ते २८ एप्रिल या कालावधीत होत आहे. सोमवारी या स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
‘‘पहिल्या फेरीत माझ्यासमोर इंडोनेशियाच्या बेलाट्रिक्स मनुपूतीचे आव्हान आहे. ती सातत्याने चांगला खेळ करीत आहे. पहिल्या फेरीपासूनच माझ्यापुढील आव्हान खडतर आहे. प्रत्येक स्पर्धा ही कठीणच असते, मग ती सुपर सीरिज असो किंवा अन्य कोणतीही.
प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतरच जेतेपदाचे स्वप्न साकार होऊ शकते. सर्व अव्वल मानांकित खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत. मी सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करीन. घरच्या मैदानावर, प्रेक्षकांच्या प्रचंड पाठिंब्यात खेळण्याचा अनुभव अनोखा असेल. माझे कुटुंबीयसुद्धा हा सामना बघायला येऊ शकतात. युवा खेळाडूंनाही वरिष्ठ खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी मिळेल,’’ असा विश्वास तिने व्यक्त केला.
दरम्यान, यजमान भारत स्पर्धेत चांगली कामगिरी करील, असा विश्वास भारताचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केला. ‘‘तयारी समाधानकारक झाली आहे. ऑल इंग्लंड आणि स्विस खुल्या स्पर्धेनंतर आम्हाला पुरेसा वेळही मिळाला आहे. या आठवडय़ात आशियाई अजिंक्यपद स्पर्धा सुरू होत आहे.
या स्पर्धेतील अनुभवाचा इंडिया ओपनसाठी फायदा होईल. या स्पर्धेच्या जेतेपदाच्या जवळ आम्ही पोहोचत आहोत; मात्र प्रत्यक्ष चषकावर नाव कोरण्यासाठी यंदा आम्ही सज्ज आहोत.
महिला दुहेरीसह पुरुष तसेच दुहेरी प्रकारातही अनेकजण सातत्याने चांगली कामगिरी करीत आहेत,’’ असे गोपीचंद म्हणाले.
यंदा एकातरी प्रकारात भारतीय खेळाडूंनी जेतेपद पटकवावे, अशी आमची इच्छा असल्याचे भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष डॉ. अखिलेश दास गुप्ता यांनी सांगितले. जगातील सर्वोत्तम बॅडमिंटनपटूंचा खेळ भारतीय बॅडमिंटनप्रेमींनी पाहावा यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.