भारतीय ऑलिम्पिक महासंघावरील (आयओए) बंदी उठविण्यासाठी आयओसीचे शिष्टमंडळ लवकरच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) पदाधिकाऱ्यांना लुसाने येथे भेटणार आहे. या शिष्टमंडळाबरोबर जाण्याची इच्छा केंद्रीय क्रीडा मंत्री जितेंद्रसिंग यांनी दाखविली आहे.जितेंद्रसिंग यांनी सांगितले, बंदीसंदर्भात शासनाबरोबर चर्चा करण्याची आयओसीचीही इच्छा आहे. आमच्यासाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट असून बंदी उठविण्याकरिता ठोस पावले घेण्याची आमची तयारी आहे. त्याकरिता आम्ही विविध खेळाडू, संघटक, प्रशिक्षक व क्रीडा संघटनांचे पदाधिकारी यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करणार आहोत. वेळ पडल्यास आयओएच्या पथकासमवेत जायची माझी तयारी आहे.
आयओएने केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या नियमावलीनुसार निवडणुका घेतल्यामुळे आयओसीने आयओएने ऑलिम्पिक नियमावलीचे पालन केले नाही असे कारण देत आयओएवर बंदी घातली होती. जोपर्यंत ऑलिम्पिकच्या नियमावलीनुसार कार्यवाही होत नाही तोपर्यंत आयओएला बैठक घेण्यासही मनाई करण्यात आली आहे. आयओसीने आयओएवर नव्याने निवडून आलेले अध्यक्ष अभयसिंग चौताला यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांना मान्यता देण्यासही नकार दिला आहे.
तसेच अन्य काही खेळांच्या राष्ट्रीय संघटनांची मान्यता काढून घ्यावी असाही आदेश आयओसीने अन्य खेळांच्या आंतरराष्ट्रीय महासंघांना दिला आहे.