पहिल्याच फेरीत डेनिल मेदवेदेव्हकडून मात ; फेडरर, जोकोव्हिचची आगेकूच
जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक असलेल्या स्वित्र्झलडच्या स्टॅन वॉविरकाचे आव्हान विम्बल्डन खुल्या टेनिस स्पध्रेतील पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. रशियाच्या डेनिल मेदवेदेव्हने या स्पर्धेतील पदार्पणातच वॉविरकाला ६-४, ३-६, ६-४, ६-१ असे पराभूत करीत सनसनाटी सलामी केली.
विम्बल्डन स्पर्धेत विजेतेपद मिळविण्याचे वॉविरकाचे स्वप्न पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. त्याने यापूर्वी ऑस्ट्रेलियन (२०१४), फ्रेंच (२०१५) व अमेरिकन (२०१६) या तीनही ग्रॅण्ड स्लॅम जिंकल्या आहेत.
दुसरीकडे जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या नोव्हाक जोकोव्हिच आणि रॉजर फेडरर यांना प्रतिस्पर्धी खेळाडूंनी माघार घेतल्याने दुसऱ्या फेरीत सहज प्रवेश करता आला. दुसऱ्या मानांकित जोकोव्हिच ६-३, २-० असा आघाडीवर असताना स्लोव्हाकियाच्या मार्टिन क्लिझनने दुखापतीमुळे माघार घेतली, तर रॉजर फेडररही ६-३, ३-० अशा आघाडीवर असताना युक्रेनच्या अॅलेक्झाड्र डोल्गोपोलोव्हला दुखापतीमुळे सामना सोडावा लागला.
अनुभवी खेळाडू मिलोस राओनिक, जुआन मार्टिन डेलपोत्रो व गर्बिन मुगुरुझा यांनी आव्हान राखले. रशियाचा मिखाइल युझिनी व ऑस्ट्रेलियाची एरिना रोडिओनोवा यांनीही विजयी सलामी दिली. कॅनडाच्या राओनिकने जर्मनीच्या जॉन लिनार्ड स्ट्रफचा ७-६ (७-५), ६-२, ७-६ (७-४) असा पराभव केला. अर्जेटिनाच्या डेलपोत्रोलाही थानसी कोक्किनाकिसा (ऑस्ट्रेलिया) याच्याविरुद्ध ६-३, ३-६, ७-६ (७-२), ६-४ असा विजय मिळविताना संघर्ष करावा लागला. डेव्हिड फेररने रिचर्ड गास्केट या २२ व्या मानांकित खेळाडूला ६-३, ६-४, ५-७, ६-२ असे पराभूत केले. फ्रान्सच्या गेल मोन्फिल्सने जर्मनीच्या डॅनियल ब्रॅण्ड्सचे आव्हान पहिल्याच फेरीत ६-३, ७-५, ६-४ असे संपुष्टात आणले. युझिनीने निकोलस माहोटला ६-२, ७-५, ६-४ असे सरळ तीन सेट्समध्ये पराभूत केले. लॅटव्हियाच्या इर्नेस्ट्स गुल्बिस यानेही एकतर्फी लढतीत डॉमिनिक व्हिक्टर एस्ट्रेला बुर्गिसवर ६-१, ६-१, ६-२ असा दणदणीत विजय नोंदविला. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू बर्नार्ड टॉमिकलाही अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. जर्मनीच्या मिस्चा जेव्हेरेव्हने त्याचा ६-४, ६-३, ६-४ असा पराभव करीत दुसऱ्या फेरीकडे वाटचाल केली. स्थानिक खेळाडू एलियाझ बेदिनीने साडेचार तासांच्या झुंजीनंतर २१वा मानांकित इव्हो कालरेविचवर मात केली. शेवटपर्यंत रंगतदार झालेला हा सामना त्याने ६-७ (५-७), ७-६ (८-६), ६-७ (७-९), ७-६ (९-७), ८-६ असा जिंकला. या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी अव्वल दर्जाचा खेळ करीत प्रेक्षकांना खेळाचा निखळ आनंद मिळवून दिला.
महिलांमध्ये चौदावी मानांकित खेळाडू मुगुरुझाने शानदार सलामी करताना रशियाच्या एकतेरिना अॅलेक्झांड्रोव्हाचा ६-२, ६-४ असा सहज पराभव केला. रोडिओनोवा व अमेरिकेची बेथिनी मॅटेक सॅण्ड्स यांनी पहिला सेट गमावल्यानंतर सव्र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण राखून विजयश्री खेचून आणली. रोडिओनोवाने रशियन खेळाडू अनास्ताशिया पॅव्हेलिचेन्कोवर ३-६, ७-६ (८-६), ९-७ अशी मात केली. सॅण्ड्सने पोलंडच्या मॅगदा लिनेटचा १-६, ६-२, ६-३ असा पराभव केला. व्हिक्टोरिया अझरेन्कोने अमेरिकेच्या कॅथरिन बेलिसला ३-६, ६-२, ६-१ असे हरविले. इंग्लंडच्या योहाना कोन्ताने चीन तैपेईची खेळाडू सुई वेई हेसिहवर ६-२, ६-२ असा सफाईदार विजय मिळविला.
आजचे महत्त्वाचे सामने
- राफेल नदाल वि. डोनाल्ड यंग, केई निशिकोरी वि. सर्जी स्टाकोव्हस्की, कॅरेन खाचानोव वि. थिएरो मोन्टेरो, अँडी मरे वि. डस्टीन ब्राऊन, ज्यो विल्फ्रेड त्सोंगा वि. सिमोन बोलेली, सॅम क्युएरी वि. निकोलोझ बासिलाश्वेली.
- वेळ : सायंकाळी ४ वा.पासून; ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर.
गरोदर असूनही मिनेला खेळली
इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही समस्येवर मात करत यश मिळवता येते याचा प्रत्यय मॅण्डी मिनेलाने दिला. साडेचार महिन्यांची गरोदर असूनही ती या स्पध्रेत खेळली. एकेरीत तिला इटलीच्या फ्रान्सेस्का शियाव्होनकडून १-६, १-६ असा पराभव स्वीकारावा लागला. ती गरोदर असूनही खेळल्याचे प्रेक्षकांना समजल्यानंतर त्यांनी उभे राहून टाळय़ांच्या गजरात तिचे कौतुक केले. तिचा दुहेरीचा सामना अद्याप बाकी आहे. मिनेला म्हणाली, ‘‘गरोदरपणासाठी विश्रांती घेण्यापूर्वीची माझी या मोसमातील अखेरची स्पर्धा आहे. मैदानावर बराच वेळ उभे राहून मी खेळले यासारखा अनोखा आनंद पुन्हा मला मिळणार नाही.’’