२०व्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर कब्जा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लंडन : ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा आणि पुरुष एकेरीचे विजेतेपद यांच्यातील समान दुवा म्हणजे नोव्हाक जोकोव्हिच, हे समीकरण रविवारी पुन्हा एकदा जुळून आले. सर्बियाच्या अग्रमानांकित जोकोव्हिचने विम्बल्डनच्या अंतिम फेरीत इटलीच्या माटेओ बेरेट्टिनीवर वर्चस्व गाजवून कारकीर्दीतील २०व्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर नाव कोरले. जोकोव्हिचचे हे वर्षांतील आणि विम्बल्डनमधीलही सलग तिसरे अजिंक्यपद ठरले.

जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेल्या ३४ वर्षीय जोकोव्हिचने सातव्या मानांकित बेरेट्टिनीला ६-७ (४-७), ६-४, ६-४, ६-३ असे चार सेटमध्ये पराभूत केले. तीन तास आणि २४ मिनिटांपर्यंत लांबलेल्या या लढतीत जोकोव्हिचने पुन्हा एकदा पिछाडीवरून सरशी साधली. या जेतेपदासह जोकोव्हिचने रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या दोघांच्या २० ग्रँडस्लॅम जेतेपदांची बरोबरी साधली. २५ वर्षीय बेरेट्टिनीला मात्र पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅमसाठी अधिक प्रतीक्षा करावी लागेल.

कारकीर्दीत सहाव्यांदा विम्बल्डन जिंकणाऱ्या जोकोव्हिचला यंदा ‘गोल्डन स्लॅम’ मिळवण्याची संधी आहे. जोकोव्हिचने यंदाच्या वर्षांत ऑस्ट्रेलियन, फ्रेंच आणि विम्बल्डन या स्पर्धा जिंकल्या असून त्याने ऑलिम्पिक व अमेरिकन स्पर्धा जिंकल्यास इतिहास रचला जाईल.

कारकीर्दीला जेव्हा सुरुवात केली, तेव्हापासून टेनिसमधील पहिल्या क्रमांकाचा खेळाडू म्हणूनच ओळख कमवायची, हेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून मी आजवर खेळत आहे. फेडरर, नदाल यांसारख्या मातब्बर खेळाडूंच्या ग्रँडस्लॅम जेतेपदाची बरोबरी साधल्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. गोल्डन ग्रँडस्लॅम मिळवण्यासाठी मी सर्वस्व पणाला लावेन.

– नोव्हाक जोकोव्हिच

जोकोव्हिचसारख्या खेळाडूविरुद्ध अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळणे, हेच मी माझे भाग्य समजतो. भविष्यात जेतेपद मिळवण्याच्या दृष्टीने अधिक परिश्रम करेन. जोकोव्हिच विश्वातील सर्वोत्कृष्ट खेळाडू का आहे, याचे उत्तर आपल्या सर्वासमोर आहे. माझे प्रशिक्षक आणि पाठिराख्यांचे मनापासून आभार.

– माटेओ बेरेट्टिनी 

जोकोव्हिचची जेतेपदे

’ ऑस्ट्रेलियन (९): २००८, २०११, २०१२, २०१३, २०१५, २०१६, २०१९, २०२०, २०२१

’ फ्रेंच (२) : २०१६, २०२१

’ विम्बल्डन (६) : २०११, २०१४, २०१५, २०१८, २०१९, २०२१

’ अमेरिकन (३) : २०११, २०१५, २०१८

 

भारतीय वंशाचा समीर बॅनर्जी अजिंक्य

’  लंडन : भारतीय वंशाच्या अमेरिकन स्थायिक समीर बॅनर्जीने रविवारी विम्बल्डनच्या मुलांच्या एकेरी गटाचे विजेतेपद मिळवले. १७ वर्षीय समीरने अंतिम फेरीत ब्रिटनच्या व्हिक्टर लिलोव्हला ७-५, ६-३ असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले. त्याचे हे कारकीर्दीतील पहिलेच जेतेपद ठरले. यापूर्वी १९५४मध्ये भारताच्या रामनाथन कृष्णनने विम्बल्डनमध्ये मुलांच्या एकेरीचे जेतेपद मिळवले होते.

मेकटिच-पाव्हिच जोडीला जेतेपद

’  लंडन : क्रोएशियाच्या निकोला मेकटिच आणि माटे पाव्हिच जोडीने विम्बल्डन टेनिस स्पर्धेमधील पुरुष दुहेरीत जेतेपद पटकावले. अग्रमानांकित मेकटिच-पाव्हिच जोडीने मार्सेल गॅ्रनोलर्स (स्पेन) आणि होरासिओ झेबालोस (अर्जेटिना) जोडीचा ६-४, ७-६ (५), २-६, ७-५ असा पराभव केला. गोरान इव्हानसेव्हिचने पुरुष एकेरीत पटकावलेल्या जेतेपदानंतर २० वर्षांनंतर प्रथमच क्रोएशियाला विम्बल्डन विजेतेपद मिळवता आले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wimbledon 2021 djokovic beats berrettini to secure 20th grand slam zws
First published on: 12-07-2021 at 03:01 IST