आज सोमवारपासून विम्बल्डनच्या १३४व्या पर्वाला सुरुवात झाली आहे. यावेळी करोनामुळे केवळ ५० टक्के प्रेक्षकांना प्रवेश मिळाला आहे. विम्बल्डनने भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज व्यक्ती सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांची आठवण काढत एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ २०१५चा आहे. या हंगामात विराट-अनुष्का आणि सचिन-अंजली विम्बल्डन पाहाण्यासाठी आले होते.

सहा वर्षांपूर्वीच्या या व्हिडिओमध्ये सचिन आणि विराट रॉजर फेडरर आणि अँडी मरे यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पाहायला आले होते. या सामन्यात फेडररने ब्रिटनच्या मरेचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र, अंतिम फेरीत फेडररला नोव्हाक जोकोविचकडून पराभव पत्करावा लागला. सचिन आणि विराट दोघेही फेडररचे चाहते आहेत.

हेही वाचा – ठरलं तर..! यंदाचा टी-२० वर्ल्डकप यूएई आणि ‘या’ देशात होणार

फेडररची शेवटची विम्बल्डन स्पर्धा?

यंदाची स्पर्धा ही फेडररची शेवटची विम्बल्डन असू शकते. मागील वेळी म्हणजेच २०२०मध्ये ही स्पर्धा करोनामुळे रद्द झाली होती. दोन वर्षांनंतर ही स्पर्धा चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी परतली आहे. २० ग्रँडस्लॅम नावावर असलेला चॅम्पियन खेळाडू रॉजर फेडररदेखील या स्पर्धेत पूर्णपणे लक्ष केंद्रित करत आहे. विम्बल्डन खेळण्यासाठी फ्रेंच ओपनच्या तिसर्‍या फेरीनंतर तो माघारला होता.

सर्बियाचा नोव्हाक जोकोविच पुरुषांमध्ये जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा टेनिसपटू आहे. त्याने यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपन जिंकले आहे. त्यामुळे जोकोविच आणि फेडरर यांच्यातील दमदार युद्ध चाहत्यांना पाहायला मिळू शकते.