‘‘शून्यातून पुन्हा विजयाचे शिखर सर करणे, ही काही सोपी गोष्ट नाही. मॅग्नस कार्लसनविरुद्ध झालेल्या पराभवानंतर माझे पती सर्वच टीकाकारांचे लक्ष्य झाले होते. त्यांनी आव्हानवीर स्पर्धेत विजेतेपद मिळविल्यामुळे मला त्यांच्या विश्वविजेतेपदापेक्षाही मोठा आनंद झाला आहे,’’ असे विश्वनाथन आनंदची पत्नी अरुणाने सांगितले.
चेन्नई येथे गेल्या वर्षी झालेल्या विश्वविजेतेपदाच्या लढतीत आनंदला पराभूत करत कार्लसन प्रथमच जगज्जेता झाला होता. या लढतीत आनंदची कामगिरी अपेक्षेइतकी झाली नव्हती. त्यामुळे घरच्या मैदानावर आनंदचा हा पराभव अनेक टीकाकारांसाठी खाद्यच झाले होते.
‘‘कार्लसनविरुद्धच्या पराभवानंतर आनंदवर चोहोबाजूंनी टीका होत होती. त्याने निवृत्त व्हावे, असा अनाहुत सल्लाही अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी दिला होता. मात्र आनंदने त्याकडे दुर्लक्ष केले. लंडनमधील स्पर्धेतही आनंदची कामगिरी अपेक्षेनुसार झाली नव्हती. तेव्हाही त्याला टीकेला सामोरे जावे लागले होते. मात्र आनंदने या सर्व गोष्टी संयमाने घेत आपल्या सरावावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळेच आव्हानवीर स्पर्धेत विजेतेपद मिळवता आले,’’ असे अरुणा हिने सांगितले.
‘‘कोणत्याही खेळाडूने अपयशाला खंबीरपणे सामोरे गेले पाहिजे. शून्यातून अव्वल स्थानाकडे कसे जाता येते, हे आनंदने दाखवून दिले आहे. केवळ आमच्यासाठी नव्हे तर साऱ्या भारतीयांसाठी हा अभिमानास्पद क्षण आहे,’’ असेही अरुणाने सांगितले.
‘‘आनंदने आव्हानवीर स्पर्धेत केलेले डावपेच पाहता तो पुन्हा विश्वविजेता होईल, अशी आम्हाला खात्री वाटू लागली आहे,’’ असे आनंदच्या आई-वडिलांनी सांगितले.