प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, असे म्हणतात. सचिन तेंडुलकर आणि विश्वनाथन् आनंद यांच्या यशस्वी कारकिर्दीकडे पाहिल्यास याची सत्यता अधिक ठळकपणे जाणवते. नोव्हेंबर महिना हा सचिन आणि आनंद या दोघांच्या कारकिर्दीसाठी ऐतिहासिक ठरला. जागतिक क्रिकेटवर तब्बल २४ वष्रे अधिराज्य गाजवल्यानंतर सचिननं निवृत्ती पत्करली, तर मॅग्नस कार्लसन यानं आनंदचं विश्वविजेतेपद खालसा केलं. भारतीयांच्या दृष्टीने या दोन्ही घटना वेदनादायी होत्या. तशाच त्या अंजली तेंडुलकर आणि अरुणा आनंद यांच्यासाठीही होत्या. अंजलीसाठी हृदयस्पर्शी, तर अरुणा यांच्यासाठी वेदनादायी. आपल्या पतीचं संसारापेक्षाही अधिक उत्कटतेनं असलेलं आपल्या खेळावरील प्रेम या दोघींनीही तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. या भावनिक प्रसंगी त्यांनीच आपल्या पतीला आधार दिला. वानखेडेवर सचिननं निरोपाच्या भाषणातून चाळीस वर्षांच्या आपल्या आयुष्याचा क्रिकेटपटच जणू उलगडला. हे भाषण संपताच त्यानं अंजलीच्या जवळ जाऊन तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं. त्या वेळी तिलाही आपले अश्रू लपवणं कठीण गेलं. याचप्रमाणे विश्वविजेतेपद गमावल्यानंतर जशी आनंदची भावनिक अवस्था खचल्यासारखी झाली होती, तसाच अरुणाचा चेहराही तिची निराशा सांगत होता. भारताच्या या दोन्ही महान खेळाडूंच्या पत्नींना विवाहापर्यंत आपल्या पतीच्या खेळातलं काहीच कळत नव्हतं, परंतु कालांतरानं त्यांनी ते आत्मसात केलं. त्यामुळेच सचिनच्या पाठीशी अंजली खंबीरपणे उभी राहू शकली आणि आनंदच्या विश्वविजेतेपदाच्या लढाईप्रसंगी त्याच्या साहाय्यकांच्या चमूत स्वत: अरुणाही होती.
१९९५मध्ये अंजली आणि सचिनचा प्रेमविवाह झाला. तेव्हापासून गेली १८ वर्षे सचिनचे यशापयश, सुख-दु:ख या प्रत्येक गोष्टीमध्ये तिने त्याला साथ दिली आहे. विवाहानंतर अनेक र्वष सचिनने घरी आपल्या कुटुंबीयांसमवेत दिवाळी साजरी केली नव्हती. याबाबत एका मुलाखतीत ती म्हणाली होती, ‘‘जेव्हा सचिन आमच्यासोबत घरी असतो, तो प्रत्येक क्षण दिवाळीसारखाच असतो.’’ सचिन देशाचा आहे आणि मग आमचा आहे, हे अंजलीच्या मनावर पक्कं कोरलं आहे. त्यामुळे आपल्या पतीच्या निवृत्तीविषयी अंजलीचे बोल सच्चे होते. ‘‘सचिनच्या निवृत्तीच्या भावना मी शब्दांत व्यक्त करू शकणार नाही. त्याने जेव्हा हा निर्णय घेतला, तेव्हा मी त्याच्या पाठीशी राहिली. मी सचिनशिवाय क्रिकेटची कल्पना करू शकते. पण क्रिकेटशिवाय सचिन हा विचारच मी करू शकत नाही,’’ अशा शब्दांत अंजलीनं आपल्या भावना प्रकट केल्या होत्या.
सचिन आणि अंजलीची १९९०मध्ये पहिली भेट झाली, तेव्हा सचिननं नुकतीच आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली होती, तर अंजलीनं डॉक्टरकीला सुरुवात केली होती. सचिन आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यावरून विमानतळावर परतत होता, तर अंजली आपल्या आईला आणायला तिथं गेली होती. या दोघांच्या पहिल्या भेटीतच त्यांच्या हृदयाच्या तारा छेडल्या गेल्या. मग काहीच दिवसांत एका मित्राकडे त्या दोघांची दुसरी भेट झाली. दोघांनीही एकमेकांना समजून घेतल्यानंतर या भेटी-गाठी वाढतच गेल्या. त्या सोनेरी दिवसांविषयी अंजली सांगते, ‘‘मला क्रिकेटमधील काहीच कळत नव्हतं, तेच सचिनला माझ्यात सर्वात जास्त भावलं असावं. मला सचिन कोण आहे, याची जाणीव काही काळानं झाली.’’
१९९५मध्ये ते दोघे विवाहबद्ध झाले. तोवर प्रथम श्रेणीमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करून अंजलीनं आपलं करिअर स्थिरस्थावर केलं होतं. परंतु सचिनच्या क्रिकेटसाठी तिनं त्याचा त्याग केला आणि त्याची कोणतीही खंत तिला आता वाटत नाही. कारण सचिन पूर्णत: प्रत्येक गोष्टीसाठी तिच्यावर अवलंबून असतो. तिनं इतक्या वर्षांच्या क्रिकेटमय प्रवासात क्वचितच मैदानावर जाऊन सचिनचे सामने पाहिले आहेत. पण घरी मात्र ती त्याच्या सर्व खेळी पाहते. पण सचिनच्या कारकिर्दीतील अखेरच्या दोन्ही कसोटी सामन्यांना मात्र तिनं आवर्जून हजेरी लावली होती.
शतकानंतर आकाशाकडे पाहून आपल्या वडिलांचे आभार मानणारा सचिन बालपणी शिवाजी पार्कच्या गणेश मंदिराच्या नळाचं पाणी आवर्जून प्यायचा. त्या पाण्यातील दैवी गुण आपल्याला खेळाला प्रेरणा देतील, असं त्या वेळी त्याला वाटायचं. ‘देवानं आपल्याला जे काही दिलं आहे आणि जे काही दिलं नाही, त्याबद्दल त्याचे आभार मानायला मला अंजलीनं शिकवलं,’ असं सचिन अभिमानानं सांगतो. आपल्या निरोपाच्या भाषणात सचिन अंजलीविषयी म्हणाला होता, ‘‘ तिच्याशिवाय मी मुक्तपणे आणि दडपणाशिवाय क्रिकेट खेळू शकलो नसतो. माझा राग, निराशा आणि काहीबाही बोलणं सहन केल्याबद्दल धन्यवाद. अंजली, माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम भागीदारी तुझ्यासोबत आहे.’’
सचिन-अंजलीचा प्रेमविवाह होता, तर आनंद-अरुणा यांचा ठरवून झालेला विवाह. आनंदशी विवाह करण्याचा निश्चय केला तेव्हा अरुणाला तो एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचा फार मोठा बुद्धिबळपटू आहे, याविषयी काहीच कल्पना नव्हती. फक्त त्याचा साधेपणा आणि मोठेपणाचा आव न आणण्याची वृत्ती, यावरच ती भाळली. विवाहानंतर तिला तिझ्या मैत्रिणींनी विचारलं, ‘‘मधुचंद्राला कुठे जाणार?’’ तिनं शांतपणे उत्तर दिलं..‘‘डॉर्टमंड.’’ स्वित्र्झलडला मधुचंद्राला जाण्याचं स्वप्न खरं तर तिनं जोपासलं होतं. परंतु चौसष्ट चौकडींच्या विश्वात रमणाऱ्या आनंदला विवाहानंतर तिसऱ्याच दिवशी डॉर्टमंडला (जर्मनी) बुद्धिबळ स्पर्धा खेळायची होती. त्यामुळे तो पत्नीला सोबत घेऊनच या दौऱ्यावर गेला. अरुणाची ती पहिलीच परदेशवारी होती. आनंदच्या पहिल्याच लढतीला सदर सभागृहातील अखेरच्या रांगेतील खुर्चीवर अरुणा बसली होती. कारण बुद्धिबळासंदर्भातील अनेक प्रश्नांची जंत्री तिच्या मनात होती. काही वेळानंतर टाळ्यांचा आवाज झाला आणि लढत संपल्याची ग्वाही मिळाली. त्यानंतर आनंदची वाट पाहत ती उभी राहिली. आनंद तिच्या समीप आला, तेव्हा त्यानं काय कर्तृत्व दाखवलंय याची त्या भाबडय़ा स्त्रीला मुळीच कल्पना नव्हती. त्यामुळे ती निर्विकारपणे त्याला पाहत राहिली. तेव्हा तो गमतीनं तिला म्हणाला, ‘‘मी माझ्या आयुष्यात असा निर्विकार चेहरा कधीच पाहिला नव्हता.’’ पण त्यानंतरची गेली १७ र्वष हाच चेहरा त्याच्यासाठी प्रेरणादायी ठरला. बुद्धिबळाच्या ध्यासापोटी तिनं आनंदसोबत जग पालथं घातलं. तिला बुद्धिबळाच्या पटावरील फारसं कळत नाही. परंतु पतीच्या यशापयशाचं गणित चांगलं कळतं. प्रवास आणि खवय्येगिरीवर दोघांचंही नितांत प्रेम. व्यवस्थापन आणि पत्रकारिता शिकलेली अरुणा आता आनंदच्या आयुष्याचं स्पध्रेचं, दौऱ्याचं आणि मानसिकतेचं व्यवस्थापन समर्थपणे सांभाळते आहे. आनंदच्या साहाय्यकांच्या चमूत ती त्याच्यासोबत लग्नानंतर प्रत्येक स्पध्रेत असायची. मूल झाल्यापासून तिला काही स्पर्धा कमी कराव्या लागल्या.
अरुणाचे वडील दिल्लीला विदेश विभागात अधिकारीपदावर कार्यरत होते. त्यामुळे अरुणालाही आनंदप्रमाणेच अनेक भाषांची गोडी लागली. दोघंही अस्खलितपणे स्पॅनिश भाषा बोलतात. याचप्रमाणे आनंदला जर्मन आणि फ्रेंच भाषाही बोलता येतात. विवाहाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये अरुणा आनंदला ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ नावानं संबोधायची. कारण विवाहाची अंगठी आनंदनं एकदा नव्हे तर तीनदा हरवली आणि प्रत्येकदा अरुणाच्या कुटुंबीयांनी त्याला नवी करून दिली होती. अखेर आनंदनंच त्यांना आता पुरे, असं स्पष्ट केल्यानंतर नवी अंगठी करण्याचं हे सत्र थांबलं.
खेळाडू मग ती स्त्री असो वा पुरुष ते खेळावर जीवापाड प्रेम करतात. त्यांच्या खेळाला आणि त्यांना समजून घेणारी व्यक्ती जोडीदार लाभली तरच त्यांचं आयुष्य आणि कारकीर्द यांच्या यशाचं समीकरण जुळतं. दुर्दैवानं आजच्या धकाधकीच्या आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात नेमकं हेच दुर्मीळ झालं आहे. परंतु तरीही सचिन-अंजली आणि आनंद-अरुणा ही दांपत्यं आदर्शवत ठरतात. याचं कारण महात्मा गांधी यांच्याच शब्दांत सांगायचं
तर..Where there is love there is life!         

Shriya Pilgaonkar reacts on fake news of being adopted by parents supriya sachin Pilgaonkar hrc 97
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
Loksatta vyaktivedh Roberto Cavalli Italian fashion design Stretch denim British designer
व्यक्तिवेध: रॉबेर्तो कावाली
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..