सरदार दस्तूर संघाने पुण्याचे प्रतिनिधित्व करताना सांगोला येथे झालेल्या महिलांच्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत जेतेपद पटकाविले. अंतिम लढतीत त्यांनी नाशिकच्या युनायटेड क्लबचा ७४-३१ असा पराभव केला.
प्रथमपासूनच वर्चस्व घेणाऱ्या दस्तूर संघाने मध्यंतराला ३४-१३ अशी आघाडी घेतली होती. विजयी संघाकडून कृत्तिका दिवाडकर (२३ गुण), श्रुती मेनन (२० गुण) व श्रुती शेरीगर (१६ गुण) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. नाशिक संघाकडून हर्षां नागरे, अमनदीपसिंग व श्रुती भांगे यांची लढत कौतुकास्पद ठरली. दस्तूर संघाने उपांत्यपूर्व फेरीत औरंगाबादला तर उपांत्य फेरीत कोल्हापूर संघाचा दणदणीत पराभव केला होता. भुवनेश्वर येथे २७ ते ३० नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या महिलांच्या राष्ट्रीय क्रीडा महोत्सवाकरिता महाराष्ट्र संघात पुण्याच्या श्रुती मेनन, आदिती कांबळे, स्नेहल पोरेडी व श्रुती शेरीगर  यांची  निवड  झाली    आहे.