क्रिकेट हा भारतात धर्म मानला जातो, पण महिला क्रिकेटकडे पाहिल्यावर मात्र तसे वाटत नाही. पुरुषांच्या संघाला जेवढे ग्लॅमर, प्रसिद्धी, पैसा मिळाला तेवढा मात्र महिलांच्या पदरी पडला नाही. पण हे चित्र करुण वाटणारे असले तरी भविष्यात हे दिवस नक्कीच बदलतील, अशी आशा यंदाच्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या भारताच्या माजी महिला क्रिकेटपटू अंजुम चोप्रा यांना वाटते. महिला क्रिकेटचे दिवस बदलतील, पण त्यांच्या स्पर्धाचा प्रचार, प्रसार आणि प्रसिद्धी व्हायला हवी, असे त्यांना वाटते. बीसीसीआयने महिला क्रिकेटला आपल्या अखत्यारीत घेतल्यामुळे सोयी-सुविधा मिळाल्या असल्या तरी त्याचा उपयोग करून घ्यायला हवा, तरच खेळाचा विकास होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. १७ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक बदल पाहिले, त्याचबरोबर महिलांची आयपीएल स्पर्धा पैशांसाठी नाही तर खेळाच्या विकासासाठी व्हावी, अशीही त्यांची भावना आहे. पण दुसरीकडे महिला क्रिकेटपटूंनीही आपला फिटनेस वाढवायला हवा, तसेच बीसीसीआयने महिला खेळाडूंशी पुरुषांप्रमाणे करार करायला हवा, अशी परखड मतेही त्यांनी या वेळी व्यक्त केली.
या वर्षीचा पद्म पुरस्कार तुम्हाला मिळाला, याबद्दल काय भावना आहे?
पुरस्कार हा बहुमान असतो आणि देशाकडून मिळालेला हा पुरस्कार आनंदित करणारा आणि प्रेरणा देणारा आहे. माझ्यासाठी हा सर्वोच्च सन्मान आहे. आतापर्यंत मी जी काही देशाची सेवा केली, त्याचे हे फलित आहे.
महिला दिनानिमित्त तुम्ही काय संदेश द्याल?
खास महिलांसाठी वगैरे मी संदेश देणार नाही, कारण आता समाज, समाज व्यवस्था आणि लोकांचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. त्यामुळे मी फक्त महिलांना नाही तर साऱ्यांनाच सांगू इच्छिते की, जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचे वेड आहे, तर तुम्ही ते स्वप्न पाहायला हवे आणि त्यांची पूर्ती कशी होईल, यासाठी झटायला हवे. मी नवव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, तेव्हा महिलांसाठी जास्त सोयी-सुविधा नव्हत्या. तो काळ खडतर होता. पण जर मी खेळायला सुरुवात केली नसती तर मी काहीच करू शकली नसती. त्यामुळे तुम्हाला जे आवडते ते तुम्ही जोपासायलाच हवे.
तुम्ही जवळपास १७ वर्षे क्रिकेट खेळलात, या काळात तुम्ही कोणते महत्त्वाचे बदल पाहिले?
पूर्वी महिलांचे क्रिकेट फार संथ व्हायचे, पण ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा आल्याने महिलांच्या क्रिकेटला चांगली गती मिळाली आहे. आता महिलांचे सामने कंटाळवाणे होत नाहीत. त्याचबरोबर कसोटी क्रिकेटच्या सुरुवातीने खेळाचा चांगला पाया तयार व्हायला मदत झाली. या दोन महत्त्वपूर्ण गोष्टींनी महिला क्रिकेट अधिकाधिक समृद्ध व्हायला मदत होईल.
महिलांच्या विश्वचषकाला १९७१ साली सुरुवात झाली, तर पुरुषांचा पहिला विश्वचषक १९७५ साली खेळवण्यात आला, पण तरीही महिला क्रिकेटला पुरुषांएवढे ग्लॅमर, प्रसिद्धी, पैसा मिळत नाही, याबद्दल काय वाटते?
याबद्दल कोणतीही तक्रार नाही. ही गोष्ट खरी आहे की, पुरुषांना जेवढे काही सारे मिळते तेवढे नक्कीच आमच्या वाटय़ाला आलेले नाही. पण हे चित्र यापुढेही असेच राहील, असे मला वाटत नाही. खेळाचा विकास, प्रचार, प्रसार झाला तर नक्कीच यापेक्षाही चांगले दिवस येतील. आमच्या सामन्यांचा जास्त प्रचार आणि प्रसार होत नाही, ते व्हायला हवे. पण या साऱ्यामध्ये चांगली गोष्ट म्हणजे महिला क्रिकेट फोफावत आहे आणि हीच सकारात्मक गोष्ट आहे.
काही वर्षांपूर्वी बीसीसीआयने महिला क्रिकेटला आपल्या अखत्यारीत घेतले, याचा कितपत फायदा झाला?
बीसीसीआयने भारतीय महिला क्रिकेट संघाला आपल्या छत्राखाली घेतल्याने बरेच फायदे झाले आहेत, ज्यामुळे भारतीय महिला क्रिकेटचा अधिकाधिक विकास होऊ शकेल. बीसीसीआय पाठीशी असल्याने मनोबल, आत्मविश्वास वृद्धिंगत झाला. पायाभूत सुविधा आम्हाला अधिक चांगल्या दर्जाच्या मिळायला लागल्या. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी आणि राज्यांतील अकादमींमध्ये आम्हाला स्थान मिळाले आणि याचा परिणाम कामगिरीवर होताना दिसेल. यामुळे भारताच्या महिला क्रिकेटमध्ये बरेच सकारात्मक बदल होतील आणि खेळाबरोबर खेळाडूंना एक सकारात्मक दिशा मिळेल.
बीसीसीआय ज्या पद्धतीने पुरुषांना सोयी-सुविधा देते, तेवढय़ा महिलांनाही मिळतात का?
बीसीसीआयने यामध्ये कधीही भेदभाव केला नाही, पण पुरुषांना जास्त मानधन मिळते, हे मात्र नक्की. त्यांना एका सामन्यासाठी २ किंवा ३ लाख रुपये मिळत असतील तर आम्हाला एका मालिकेसाठी एवढे मानधन मिळते. कदाचित यामागे कामगिरी आणि स्पर्धा यांचेही गणित असू शकेल. पण बीसीसीआयने आम्हाला उच्च दर्जाच्या सोयी-सुविधा देण्याचा विचार केला आहे.
यंदाच्या विश्वचषकाच्या वेळी भारतीय संघ हॉटेलपासून मैदानापर्यंत चालत येताना दिसला, ही पुरुष आणि महिला संघांमध्ये बीसीसीआयने तफावत केली आहे का?
मला वाटत नाही. कारण बीसीसीआय असे करणार नाही. एखादी साधी कंपनीही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी प्रवासाची व्यवस्था करते, मग बीसीसीआय का करणार नाही. कदाचित मुलींपर्यंत बसेस पोहोचल्या नसतील किंवा मुलींनीच चालत जाणे पसंत केले असावे. पण हे नेमके कसे घडले, हे मला तपशीलवार माहिती नाही.
पुरुषांप्रमाणे महिला क्रिकेटपटूंशी बीसीसीआय करार करते का?
भारतीय महिला क्रिकेटपटूंना करारबद्ध करण्यात येत नाही. पण ही सुरुवात आहे, हे सारे यापुढे महिला क्रिकेटमध्ये येईलच. मला अशी आशा आहे की, येत्या काही दिवसांमध्ये बीसीसीआय महिलांशीही करार करू शकेल. त्यांचे याबाबत नियोजन सुरू असेल आणि नक्कीच तो दिवसही उगवेल.
स्त्री-पुरुष अशा भेदभावाचा अनुभव तुम्हाला येतो का?
नक्कीच नाही. कारण महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन आता पूर्णपणे बदलला आहे. एखादी गोष्ट फक्त महिलाच करणार किंवा पुरुषच करणार, असे आता राहिलेले नाही. महिलाही आता हिरिरीने पुढे येऊन नवीन क्षेत्रांमध्ये आपले ठोस पाऊल टाकत आहेत. त्यामुळे आताच्या घडीला जेवढा पुरुषांना सन्मान मिळतो, तेवढाच आम्हालाही मिळतो.
पुरुषांच्या आयपीएलला प्रचंड ग्लॅमर आणि पैसा मिळाला, त्यामुळे महिलांचेही आयपीएल व्हावे, असे तुम्हाला वाटते का?
हो नक्कीच, का नाही? पण बीसीसीआयकडे तेवढा वेळ असायला हवा, ते सध्याच्या घडीला एवढे व्यस्त आहेत की, त्यांचे वेळापत्रक दमछाक करणारे आहे. पण महिलांसाठी आयपीएल हवी तर ती फक्त पैशांसाठी नको, तर खेळाच्या विकासासाठी असायला हवी. यासारख्या स्पर्धामुळे महिलांना अधिकाधिक सामने खेळता येतील आणि त्यामुळे त्यांच्या कामगिरीत अधिकाधिक सुधारणा होईल.
पुरुषांइतक्या महिलांच्या स्पर्धा भारतात का होत नाहीत, याबाबत तुला काय वाटते?
भारतामध्ये कदाचित तितके संघ नसतील, त्यामुळे या स्पर्धा बीसीसीआय घेत नसेल. पण देशांतर्गत स्पर्धा जास्त व्हायला हव्यात. कारण त्यामुळे खेळाचा आणि खेळाडूंचा दर्जा वाढायला मदत होते. त्यामुळे खेळाचा विकास होऊ शकतो.
ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारख्या महिला खेळाडूंपेक्षा भारतीय महिला फिटनेसमध्ये कमी पडतात का?
हो, काही अंशी यात तथ्य आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंडच्या खेळाडूंकडे जसा फिटनेस आहे, तसा भारतीय संघात नाही. संघासाठी व्यावसायिक प्रशिक्षक, ट्रेनर आहेत. सरतेशेवटी फिटनेस राखणे हे प्रत्येक खेळाडूवर असते. त्यामुळे भारतीय महिलांनी याबाबत विचार करायला हवा.
भारतीय महिला क्रिकेटचे सध्या काय स्थान आहे, असे तुला वाटते?
सध्या महिला क्रिकेटपटूंना मिळणाऱ्या सुविधांचा पुरेपूर वापर करून घ्यायला हवा. आपण जर एकाच ठिकाणी राहिलो तर विकास होणार नाही, उलटपक्षी समस्या अधिक वाढतील. आपण सातत्याने पुढे जायचा विचार करायला हवा, तसा दृष्टिकोन असायला हवा, तरच आपले स्थान अधिक बळकट होऊ शकेल. २०१३च्या विश्वचषकामध्ये महिलांना चांगली कामगिरी करता आली नाही, त्यामध्ये नक्कीच सुधारणा व्हायला हवी. बीसीसीआय ठामपणे पाठीशी उभी आहे, एक छत्र डोक्यावर आहे. त्यामुळे सुरक्षितता आहे. यामुळे मला अशी आशा आहे की, भारतीय महिला क्रिकेटला यापुढे नक्कीच उज्ज्वल भवितव्य आहे.